MP Girish Bapat passed away in Pune भाजपाचा आधारस्तंभ हरपला : खासदार गिरीश बापट यांचे पुण्यात निधन


BJP’s pillar lost : MP Girish Bapat passed away in Pune पुणे : महाराष्ट्रातील भाजपच्या जेष्ठ नेत्यांपैकी एक असलेले पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे आज बुधवारी पुण्यात निधन झाले. त्यांचे पार्थिव दुपारी 2 ते 6 पर्यंत शनिवार पेठेतील निवासस्थानी अंतदर्शनासाठी ठेवण्यात येईल. संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक
गिरीश बापट हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. जनसंघापासून ते राजकारणात उतरले. बापट यांनी त्यांच्या राजकारणाची सुरूवात नगरसेवक पदापासून केली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पुणे लोकसभा मतदारसंघातून विजय झाला होता. काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा त्यांनी या निवडणुकीत पराभव केला होता.

सलग पाचवेळा राहिले आमदार
चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीत गिरीश बापट यांनी संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार, राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अशा विविध पदावर काम केले. पुणे शहरातील राजकारणात बापट यांची चांगली पकड होती. ते शहरातील मध्यवर्ती विधानसभा मतदारसंघ असणार्‍या कसबा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.

सर्वांचे ’भाऊ’
पुणे जिल्ह्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या गिरीश बापट यांनी तरुणपणी टेल्को कंपनीत काम केले होते. त्यावेळी त्यांनी कामगारांच्या मागण्यांसाठी अनेकदा लढाही दिला होता. आणीबाणीनंतर गिरीश बापटांच्या राजकीय प्रवासाला सुरूवात झाली. आणीबाणीच्या काळात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांतील विविध पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली. 1983 मध्ये पुणे महानगरपालिका निवडणुकीत ते नगरसेवक झाले. सलग तीन वेळा बापट नगरसेवक म्हणून निवडून आले होते. विशेष म्हणजे याच काळात आपल्या सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर गिरीश बापट महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते.


कॉपी करू नका.