विधानपरिषद निवडणुकीत मुलाची उमेदवारी डावलल्यानंतर मंत्री गुलाबराव स्पष्टच म्हणाले, नसीब में होगा…!
जळगाव (4 जून 2026) : आपल्या मुलाला आमदार करण्याचे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वप्न अधुरे राहिले आहे. विधानपरिषद निवडणुकीत मुलाला उमेदवार न मिळाल्यावरून मंत्री गुलाबराव पाटील नाराज असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी वारंवार चर्चा करूनही भाजपने ही जागा न सोडल्याने पाटील यांच्या मनातील खदखद कायम आहे. त्यांनी आपल्या खास शैलीत, ‘नसीब में होगा तो उचलकर आयेगा, नही होगा तो’ अशी शेरोशायरी करत आपल्या मनातील या तीव्र भावनांना वाट मोकळी करून दिली.
काय म्हणाले मंत्री पाटील ?
गुलाबराव पाटील म्हणाले, अनेक लोक म्हणतात की तुम्हाला विधानपरिषदेसाठी तिकीट मिळाले नाह मात्र मी एवढेच सांगतो, ‘नसीब मे होगा तो उचलकर आयेगा और नसीब में नही होगा तो आकर चला जायेगा’, अशी शायरी त्यांनी म्हणून दाखवली. पुढे ते म्हणाले की, देवाच्या मनात यापेक्षाही पुढे आयुष्यात काही चांगले होणार असेल त्यामुळे प्रारब्धावर विश्वास ठेवा. सगळे करा, राजकारण जरूर करा, पण भगवा प्रकाशातील विचार कधी सोडू नका. तुम्ही आमदार केले, मंत्री केले म्हणून मी सामाजिक कार्य करतो आहे. तुमची सेवा करू शकतो आहे, असेही पाटील यांनी म्हटले आहे.
मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी शर्थीचे प्रयत्न केले
आपल्या मुलाला विधान परिषदेची उमेदवारी मिळावी यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मुंबईत ठाण मांडून एकनाथ शिंदे यांच्या अनेकदा भेटी घेत शर्थीचे प्रयत्न केले मात्र भाजपने ही जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिल्याने त्यांच्या पदरी मोठी निराशा आली. शिंदे गटातील ही उघड नाराजी कुणाच्या पथ्थ्यावर पडणार? हे लवकरच कळणार आहे.
भाजप उमेदवाराचा अर्ज भरताना गैरहजर
जळगावमधील भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल करताना मंत्री गुलाबराव पाटील अनुपस्थित राहिल्याची जोरदार चर्चा होती. जळगाव जिल्ह्यात उपस्थित असूनही शिवसेनेचे इतर आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनीदेखील अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला गैरहजर राहणे पसंत केल्याने, मित्रपक्ष भाजपवर असलेली शिंदे गटाची ही तीव्र नाराजी आता उघडपणे चव्हाट्यावर आली आहे.



