18 वर्षीय तरुणीला ड्रग्जच्या आहारी नेत अत्याचार : जळगावातील तिघांविरोधात गुन्हा
18-Year-Old Woman Exploited After Being Lured into Drug Addiction: Case Registered Against Three Individuals in Jalgaon जळगाव (4 जून 2026) : 18 वर्षीय तरुणीसोबत मैत्री केल्यानंतर तिला नशेच्या आहारी नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी तीन तरुणांविरोधात जळगावच्या रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने अत्याचाराचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली तर जाच असह्य झाल्याने पीडीतेने रामानंद पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. निर्मल दिनेश तिवारी (रा. प्रजापती नगर, जळगाव) असे मुख्य संशयिताचे नाव असून त्याला गुन्ह्यात मदत करणारे त्याचा मित्र जय चौधरी (रा.शिव कॉलनी, जळगाव) आणि गौरव पुरोहित (रा.जळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
असे आहे प्रकरण ?
संशयीत निर्मल तिवारीने 18 वर्षीय तरुणीला मैत्रीच्या जाळ्यात ओढून तिला सिगारेट, ड्रग्जसह गांजाचे व्यसन लावले व पीडितेसह तिच्या मैत्रिणीला एका कारमधून मोहाडी रोडवरील हॉटेलवर नेले. तिथे निर्मलने तिला दारू आणि गांजा पाजत ज्यूसमध्ये गुंगीचे औषध (ड्रग्ज) मिसळून दिले. पीडिता नशेत आणि बेशुद्धावस्थेत असताना निर्मलने तिच्यावर अमानुषपणे लैंगिक अत्याचार केले. त्याने या संपूर्ण प्रकाराचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये काढून ठेवले.
इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटवरून ब्लॅकमेलिंग
संशयीत निर्मलने ते अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेवर वारंवार अत्याचार केले. फेब्रुवारी 2026 मध्ये पीडितेचा मोबाईल खराब झाल्याने तिने तरूणाशी संपर्क तोडला मात्र एप्रिलमध्ये त्याने थेट तिच्या घरी जाऊन तिला धमकावले. यानंतर निर्मलचे मित्र जय चौधरी आणि गौरव पुरोहित यांनीही पीडितेला इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट या समाजमाध्यमांवरून अश्लील मेसेज पाठवत छळ सुरू केला व त्रासाला कंटाळून पीडितेने रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.



