शेतकर्‍यांना लुटल्यास गाठ माझ्याशी : रावेरात आमदारांची टोल व्यवस्थापनाला तंबी


रावेर : रावेर-बर्‍हाणपूर दरम्यान असलेल्या टोल नाक्यावर शेतकर्‍यांना लुटले जात असल्याची तक्रार आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे आल्यानंतर त्यांच्यासह प्रहार जनशक्तीचे नेते अनिल चौधरी यांनी शनिवारी टोल नाक्यावर धडक दिली. नागरीकांसह शेतकर्‍यांची अडवणूक करणार्‍या कर्मचार्‍यांना फैलावर घेत यापुढे असे प्रकार झाल्यास गाठ माझ्याशी असल्याची तंबी आमदारांनी दिली.

टोल व्यवस्थापनाने दिली हमी
रावेर विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी व ग्रामस्थांची रावेर-बर्‍हाणपूर दरम्यानच्या टोल नाक्यावर अडवणूक होत आहे. शेतकर्‍यांकडून बळजबरी टोल वसुली करणे, अरेरावी करणे, वाहतूक समस्या निर्माण करणे तसेच इतर गोष्टींबाबत येथील कर्मचारी अरेरावी करून दादागिरी करीत असल्याने आमदारांकडे याची तक्रार करण्यात आली होती. शनिवारी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील व प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी रावेर-बर्‍हाणपूर टोल नाक्यावर धडक देत व्यवस्थापनाला जाब विचारला तसेच कडक इशारा देत पुन्हा असे गैरप्रकार टोल नाक्यावर होणार नाही याची हमी व्यवस्थापनाकडून घेतली.

आमदारांच्या तंबीनंतर शेतकर्‍यांमध्ये समाधान
आमदारांनी टोल मॅनेजर पांडे यांना कडक शब्दांमध्ये समज दिल्याने नागरीकांसह शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी व रावेर तहसीलदारांसोबत चर्चा होत नाही तोपर्यंत टोल सुरू करायचा नाही, अशी समजही दिली. या वेळी वाय.डी.पाटील, संदीप पाटील, उमेश वरणकर, भैय्या पाटील, संजय कोळी, मुजफ्फर भाई, मझहर खान, कुणाल बागरे, शांतीलाल पाटील, मुकेश पाटील यांच्यासह शेतकरी व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !