भुसावळात बसस्थानकाचे स्थलांतर ; महामानवाच्या जयंतीनिमित्त अपूर्व उत्साह

22 उपद्रवींना शहर बंदी : मिरवणूक मार्गाची प्रशासनाकडून पाहणी : 29 मिरवणुका निघणार


Shifting of bus stand in Bhusawal ; Unprecedented enthusiasm on the occasion of the great man’s birth anniversary भुसावळ  : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त शहरात अपूर्व उत्साहाचे वातावरण आहे. संपूर्ण शहरात रोशनाई करण्यात आली असून ठिकठिकाणी डिजिटल फलक लावण्यात आले आहेत. शुक्रवारी दिवसभरात भुसावळ शहर व बाजारपेठ हद्दीतून 29 मिरवणुका निघणार आहेत. दरम्यान, जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने काटेकोर बंदोबस्ताचे नियोजन केले असून उपद्रवींवर करडी नजर ठेवण्यात आली आहे तर प्रांताधिकार्‍यांनी 22 उपद्रवींना शहर बंदीचे आदेश पदभार घेताच काढले आहेत. गुरुवारी पोलीस व प्रांताधिकारी प्रशासनाने शहरातील मिरवणूक मार्गाची पाहणी केली. यावेळी रस्त्यावर हातगाड्या लावणार्‍या विक्रेत्यांना सूचनाही देण्यात आल्या तर पालिकेने महामानवाच्या पुतळा परीसरातील रस्त्याची दुरवस्था पाहता रात्रीतून डांबरीकरण केल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. शुक्रवारी पहाटे सहा वाजेपासून बसस्थानकाचे एका दिवसासाठी भुसावळ आगारात स्थलांतर करण्यात आले आहे.

प्रशासनाकडून मिरवणूक मार्गाची पाहणी
गुरुवारी सायंकाळी भुसावळचे नूतन प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ निरीक्षक राहुल गायकवाड, शहरचे निरीक्षक गजानन पडघण आदींनी यावल रोडवरील गांधी पुतळ्यापासून जुन्या पालिकेसमोरील महामानावाच्या पुतळ्यापर्यंत असलेल्या मिरवणूक मार्गाची पाहणी केली. याप्रसंगी रस्त्यावरील विक्रेत्यांना सूचनाही अधिकार्‍यांनी केल्या. रीपाइं उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे उपस्थित होते.

बसस्थानकाचे एका दिवसासाठी स्थलांतर
महामानवाच्या जयंतीनिमित्त शहरातील वाहतूक एका दिवसासाठी वळविण्यात आली असून बसस्थानक गुरुवारी पहाटे सहा वाजेपासूनच वरणगाव रोडवरील एस.टी.डेपोत स्थलांतरीत करण्यात आले तर सायंकाळी पाच वाजेनंतर जामनेर रोडने येणार्‍या वाहनांच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे. फैजपूरकडे जाणार्‍या चारचाकी गाड्या या मामाजी टॉकीजकडून न जाता महार्मावरून वाय पॉइंटवरून लोणारी हॉलकडून गांधी पुतळ्याकडे येतील व पुढील नियोजीत मार्गावर धावतील.

मिरवणुकांमुळे मार्ग बंद
जयंतीनिमित्त वाहतूक कोंडी निर्माण न होण्यासाठी पु.ओ. नाहाटा कॉलेजकडून शहरात येणार्‍या मोठ्या वाहनांना बॅरीकेट लावून बंदी केली जाणार आहे. शहर व बाजारपेठ हद्दीतून 29 मिरवणुका दिवसभरात निघणार असल्याने त्यासाठी चोख बंदोबस्त व नियोजन करण्यात आले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पालिका कार्यालयासमोरील पुतळ्याचा परीसर चकाचक करून रंगरंगोटी करण्यात आली असून शुक्रवारी मध्यरात्री 12 पासून अभिवादनासाठी गर्दी उसळणार आहे शिवाय जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !