भुसावळसह अमळनेर, जामनेर हद्दीतून सहा दुचाकींची चोरी : एमपीतील आरोपी शहर पोलिसांच्या जाळ्यात

चोपडा बसस्थानक परिसरातून आवळल्या आरोपीच्या मुसक्या : आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता


Six two-wheelers stolen from Bhusawal, Amalner, and Jamner areas ; accused from MP nabbed by city police भुसावळ (9 जुलै 2026) : भुसावळ शहर व परिसरातून वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनानंतर शहर पोलिसांनी गस्त वाढवली होती तर शहर निरीक्षक महेश गायकवाड यांना एका दुचाकी चोरट्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकास निर्देश दिल्यानंतर चोपडा बसस्थानकाच्या परिसरातून एमपीतील संशयीताला अटक करण्यात आली. आरोपीने भुसावळ शहर हद्दीतून तसेच अमळनेर व जामनेर पोलीस ठाणे हद्दीतून सहा दुचाकी चोरल्याची कबुली देत या दुचाकी काढून दिल्या आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ शहरातील झेडटीएस रोडवरील एमओएच पार्किंग शेड येथून फिर्यादी विजय जगन्नाथ खडके (45, मोहित नगर, भुसावळ) यांची सुमारे 15 हजार रुपये किमतीची मोटरसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी 27 जानेवारी 2026 रोजी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शहर पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांना दुचाकी चोरीबाबत संशयीताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. संशयित आरोपी विशाल राजेंद्र राठोड (46, रा. सरदार वल्लभभाई मार्ग, अमनखेड रोड, गणेश मंदिराजवळ, भिकनगाव, जि. खरगोन, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने मोटरसायकल चोरीच्या सहा गुन्ह्यांची कबुली दिली व दुचाकी काढू दिल्या.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, नाईक अब्दुल रज्जाक खान, कॉन्स्टेबल सुबोध मोरे, राहुल बेहेनवाल, कुणाल सोनवणे, दीपक पाटील आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !