कारागृहातून सुटताच घरफोडी सत्र : जळगाव तालुका पोलिसांच्या जाळ्यात अडकली स्थानिक टोळी : 10 गुन्ह्यांची उकल

आरोपींकडून चार दुचाकी जप्त : आरोपींनी दिली नऊ घरफोड्यांची तसेच एका चोरीची कबुली


Burglary Spree After Prison Release : Local Gang Caught by Jalgaon Taluka Police; 10 Cases Solved जळगाव (9 जुलै 2026) : गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे एमपीडीए कारवाईसाठी नागपूरात स्थानबद्ध असलेल्या टोळीने कारागृहातून बाहेर पडताच जळगाव तालुका हद्दीत घरफोड्यांचे सत्र सुरू केले मात्र गोपनीय माहितीच्या आधारे जळगावातील कुख्यात टोळीला जळगाव तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपींच्या अटकेनंतर नऊ घरफोडी तसेच एका चोरीची उकल झाली आहे. आरोपींकडून 4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दहा गुन्ह्यांची उकल
जळगाव तालुका निरीक्षक शशिकांत पाटील यांनी वाढत्या घरफोड्यांच्या अनुषंगाने गस्त वाढवली होती. त्यांना टोळीबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकासह सापळा रचून पाच आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी 9 घरफोडी आणि एका मोटारसायकल चोरी अशा एकूण 10 गुन्ह्यांची कबुली दिली.

या आरोपींना अटक
अटक करण्यात आलेल्यांमध्ये म्होरक्या गुरुजीतसिंग सुजानसिंग बावरी (26, शिरसोली नाका, तांबापुरा, जळगाव), दीपक बापू पाटील (23, तांबापुरा, जळगाव), राजेश माणिक राठोड (24, तांबापुरा, जळगाव), सुमित संजय कोळी (19, रामेश्वर कॉलनी, जळगाव) व महेश उर्फ संतोष भोई (24, तांबापुरा, जळगाव) यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून घरफोडीतील दोन लाख 30 हजार रुपयांचा ऐवज तसेच दोन लाख रुपये किंमतीच्या चार मोटारसायकली असा एकूण चार लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

कारागृहातून सुटताच अवलंबले घरफोडीसत्र
मुख्य आरोपी गुरुजीतसिंग बावरी हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाणे, पेठ पोलीस ठाणे आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्यात मिळून 13 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यापूर्वी त्याच्यावर महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती आणि त्याला एका वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. कारागृहातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा घरफोडीचे सत्र सुरू केले होते मात्र जळगाव तालुका पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत संपूर्ण टोळीला जेरबंद करण्यात यश मिळविले.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तालुका पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, एपीआय नयन पाटील, उपनिरीक्षक विजय पाटील, प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक यज्ञजीता येडले, हवालदार प्रदीप राजपूत, डीबीचे हवालदार अविनाश देवरे, योगेश पाटील, नरेंद्र पाटील, श्रीकांत बदर, कैलास इंगळे, प्रशांत ठाकूर, शरद पाटील, दीपक देवरे, वाहन चालक अशोक पाटील, पंकज देशमुख आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !