भुसावळात गुरांची निर्दयतेने वाहतूक : 19 म्हशींची सुटका ; ट्रक चालकाला अटक

गुरांची निर्दयतेने वाहतूक होत असताना नागरीकांची सतर्कता : शहर पोलिसांच्या कारवाईने खळबळ


Cruel Cattle Traffic in Bhusawal : Rescue of 19 Buffaloes; Truck driver arrested भुसावळ : भुसावळ शहरातील वाय पॉईंटवर ट्रकमधून गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती सुज्ञ नागरीकांना कळाल्यानंतर त्यांनी ट्रक अडवत शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतर गस्तीपथकाने धाव घेतली. यावेळी ट्रकमधून गुरांची अत्यंत निदर्यतेने वाहतूक करणार्‍या ट्रक चालकाला ताब्यात घेत 19 म्हशींची सुटका करण्यात आली. ट्रक चालकाकडे म्हशींच्या वाहतुकीचा कुठलाही परवाना न आढळल्याने या प्रकरणी शहर पोलिसात प्राण्यांची निर्दयतेने वाहतूक कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रक चालकाला अटक करण्यात आली. दरम्यान, ट्रकमधील 19 म्हशींची खिरोदा, ता.रावेर येथे गो शाळेत रवानगी करण्यात आली.

संशय आल्याने ट्रक चालक जाळ्यात
भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी मंगळवारी रात्री गस्तीवर असताना 11.30 वाजेच्या सुमारास काही सुज्ञ नागरीकांना ट्रकमधून गुरांची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वाय पॉईंटजवळील जॉली पंपाजवळ ट्रक अडवला. यावेळी पोलिसांना माहिती दिल्यानंतर गस्तीपथकाने धाव घेत ट्रक (एम.एच.19 बी.जी.8807) ची तपासणी केली असता ट्रकमध्ये अत्यंत दाटीवाटीने व निर्दयतेने म्हशींची वाहतूक होत असल्याचे दिसून आले शिवाय ट्रक चालक कल्लूखान नबूखान (45, महाराजखेडी, ता.कसरावळ, जि.खरगोन, मध्यप्रदेश) याच्याकडे म्हशींच्या वाहतुकीबाबत परवाना नसल्याने ट्रक शहर पोलिसात आणण्यात आला. या प्रकरणी मध्यरात्री कॉन्स्टेबल मोहन दीवाणसिंग पाटील यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक कल्लूखान नबू खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

19 म्हशींची गो शाळेत रवानगी
बुधवारी सकाळी शहर पोलिसांनी ट्रकमधून ताब्यात घेतलेल्या 19 म्हशींची खिरोदा येथे गो शाळेत रवानगी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. संशयित ट्रक चालक कल्लू खान नबू खान याने रतलाम भागातून या म्हशी घेत त्या जामनेरकडे नेत असल्याची कबुली दिली आहे. या संदर्भात गुरे व्यापारी आल्यानंतर या म्हशींची नेमक्या वाहतुकीचा उद्देश समोर येणार आहे. तपास पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहर निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय सोनवणे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !