आपल्याविरोधातील गुन्हा राजकीय दबावातून : बबलू खान
भुसावळ : आमदार संजय सावकारे यांच्याविषयी अपशब्द वापरून सोशल मिडीयावर पोस्ट टाकल्याप्रकरणी प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांचा निकटवर्तीय कार्यकर्ता असलेल्या बबलू खानविरोधात बाजारपेठ पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात खान यांनी गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत निवेदन दिले आहे. आपल्याविरोधात दाखल झालेला गुन्हा राजकीय हेतूने प्रेरीत असून त्याबाबत कुठलीही शहानिशा करण्यात आली नसल्याचे त्यात नमूद आहे.
चौकशी न करताच दाखल केला गुन्हा
स्थानिक आमदारांबाबत शहरात चुकीच्या पद्धतीच्या विविध चर्चा सुरू असताना त्या आशयाची पोस्ट सोशल मीडियाच्या फेसबुक या माध्यमावर मी टाकली होती. याबाबत विषयाची सविस्तर चौकशी न करता अथवा शहानिशा सहाय्यकाच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे निवेदनात नमूद असून विकासकामांची चौकशीही व्हावी, असे निवेदनात नमूद आहे.

