भुसावळ कृउबा निवडणूक : ‘शेतकरी विकास पॅनल’मध्ये रंगणार सामना ; 18 जागांसाठी 38 उमेदवार रींगणात

आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला


Bhusawal Market Committee Election भुसावळ : भुसावळ बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आखाडा तापल्यानंतर बोदवड उपबाजार समितीच्या विभाजनाबाबत पणन सचिवांनी आदेश काढल्याने निवडणूक लांबणीवर पडण्याची चिन्हे होती तर औरंगाबाद खंडपीठात निवडणुकीला स्थगिती मिळण्याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. गुरुवारी या याचिकेवर सुनावणी होवून याचिका फेटाळण्यात आल्याने भुसावळ कृउबाची निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, गुरुवार, 20 रोजी माघारीचा अंतीम दिवस असल्याने बाजार समितीतील चित्र स्पष्ट झाले आहे. 18 जागांसाठी 38 उमेदवार रींगणात असून शुक्रवारपासून प्रचाराचा धुराळा उडणार आहे. या निवडणुकीत आमदार एकनाथराव खडसे, माजी आमदार संतोष चौधरी व आमदार संजय सावकारे यांच्या पॅनलमध्ये सरळा-सरळ लढत होणार असल्याने या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेष म्हणजे दोन्ही कडच्या नेत्यांनी आपण ‘शेतकरी पॅनल’च्याच माध्यमातून लढण्याची घोषणा केली असून तालुक्यातील राजकीय इतिहासात ही बाब प्रथमच घडल्याचे बोलले जात आहे.

खंडपीठात याचिका फेटाळली
6 एप्रिल 2023 रोजी पणन विभागाच्या सचिवांनी राज्य निवडणूक सहकार प्राधिकरणाला बोदवड उपबाजार समितीचे मुक्ताईनगरातून विभाजन ती भुसावळ बाजार समितीला ती संलग्न करण्याबाबत पत्र दिले होते त्यामुळे मुक्ताईनगरसह भुसावळ बाजार समितीची निवडणूक लांबणीवर पडणार असल्याची चर्चा होती मात्र त्या संदर्भात माघारीच्या दिवसापर्यंत आदेश निघाले नसल्याचे निवडणूक सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शेलवड ग्रामपंचायत सदस्य दीपक माळी व शेमळदे, ता.मुक्ताईनगर येथील विकासो सदस्य संजय पाटील यांनी खंडपीठात रीट याचिका दाखल करीत निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी केली होती. निवडणूक झाली तरी निवडून आलेल्या सदस्यांचा कालावधी कमी असणार असल्याचा मुद्दा याचिकेद्वारे मांडण्यात आला होता मात्र गुरुवारी सुनावणीअंती खंडपीठाने ही याचिका फेटाळल्याची माहिती आहे.

भुसावळ कृउबासाठी तापला आखाडा : 38 उमेदवार रींगणात
खंडपीठाने फेटाळलेली याचिका शिवाय निवडणूक स्थगितीबाबत आजवर कुठलेही आदेश निघाले नसल्याने निवडणूक नियोजित तारखेला होणार असल्याचे स्पष्ट आहे. कधी काही एकमेकांचे कट्टर विरोध असलेले आमदार एकनाथ खडसे व माजी आमदार संतोष चौधरी हे या निवडणुकीत एकत्र आले असून आमदार संजय सावकारे यांच्या विरोधात त्यांनी षड्डू ठोकले आहेत त्यामुळे जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून या निवडणुकीकडे लागल्याने आखाडा तापल्याचे चित्र आहे. गुरुवारी माघारीच्या दिवशी 24 उमेदवारांनी माघार घेतली तर यापूर्वी सहा उमेदवारांनी माघार घेतल्याने एकूण 30 उमेदवार रींगणातून बाहेर पडले तर पाच उमेदवारांनी दोन अर्ज भरल्याने तेदेखील मागे घेण्यात आल्याने एकूण 18 जागांसाठी 38 उमेदवार रींगणात राहिले आहे.

समोरा-समोर होणार लढत
सूत्रांच्या माहितीनुसार, विविध कार्यकारी सोसायटी (सर्वसाधारण) जागेसाठी 14, इतर मागाग वर्गीय दोन, महिला प्रवर्ग चार, विजाभज चार तसेच ग्रामपंचायत सर्वसाधारण चार व अनु.जाती जमाती व आर्थिक दुर्बलसाठी दोन उमेदवार रींगणात आहेत. व्यापारी गटासाठी चार तसेच हमाल-मापाडीसाठी दोन उमेदवार रींगणात असल्याची माहिती निवडणूक अधिकारी प्रशांत विरकर, सहा.निवडणूक अयूब तडवी यांनी दिली.

आज अंतीम यादी व चिन्ह वाटप
बाजार समिती निवडणुकीच्या रींगणातील उमेदवारांची यादी शुक्रवारी प्रसिद्ध केली जाणार असून याच दिवशी उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार असल्याचे विरकर म्हणाले. 28 रोजी मतदान व 29 मतमोजणी होणार असल्याने निवडणुकीसाठी तालुक्यात चांगलेच वातावरण तापले आहे.

एकच पॅनल नावामुळे वाढला संभ्रम
सूत्रांच्या माहितीनुसार, खडसे-चौधरी गटाले शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून सर्व जागांवर लढण्याची घोषणा केली आहे तर आमदार सावकारे प्रणित शेतकरी पॅनलच्या माध्यमातून सर्व जागांवर उमेदवार उभे करण्यात आले आहे. यापूर्वी इतिहासात कधीही एकाच पॅनलद्वारे दोघा प्रतिस्पर्ध्यांनी निवडणूक लढण्याचे उदाहरण ऐकीवात नाही मात्र यंदाच्या निवडणुकीत दोघा बाजूने शेतकरी विकास पॅनलच्या अजेंड्यावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.

खडसेंच्या उपस्थितीत आज मेळावा
आमदार खडसे-चौधरी प्रणीत शेतकरी विकास पॅनलचा शहरातील शिवपूर कन्हाळा रस्त्यावरील मौर्या हॉलमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी आमदार संतोष चौधरी, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. विकासो संचालक, ग्रामपंचायत सदस्य, हमाल मापाडी व व्यापारी मतदारांनी उपस्थिती देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

भाजपाने फुंकले रणशिंग :आज मेळावा
आमदार संजय सावकारे व आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाचा शहरातील स्टार लॉनमध्ये शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता शेतकरी विकास पॅनलचा मेळावा होत आहे. विकासो संचालक, ग्रामपंचायत सदस्य, हमाल मापाडी व व्यापारी मतदारांनी उपस्थिती देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !