बामणोदला किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी : परस्परविरोधात गुन्हे
Clash between two groups over minor dispute in Bamanod : Crimes against each other यावल : तालुक्यातील बामणोद येथे विठ्ठल मंदिरासमोर सार्वजनिक ठिकाणी काही एक कारण नसतांना दोघांना आठ जणांनी लोखंडी रॉड व लाठ्या काठ्यांनी जबर दुखापत केली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला तर दुसर्या गटानेही मारहाण केल्याचा आरोप करीत गुन्हा दाखल केला आहे.
कारण नसताना मारहाणीचा आरोप
बामणोद, ता.यावल येथील चेतन कैलास केदारे या तरुणाने फैजपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, बामणोद गावात तो विठ्ठल मंदिरासमोर आपल्या मित्रा सोबत असतांना काही एक कारण नसतांना फिर्यादी चेतन केदारे व राहुल केदारे या दोघांना पप्पू शालिक सोनवणे, पप्पू सोनवणे यांचा भाऊ, चेतन अनिल सोनवणे, बकर्या वाला बुधा चा नातू, सागर समाधान सोनवणे, तेजस सोनवणे, अक्षय नितीन सोनवणे, दगडू सोनवणे यांचा मोठा मुलगा भूषण अशा आठ जणांनी येऊन लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्या घेऊन मारहाण केली. या घटनेत दोघांना दुखापत झाली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दंगलीसह विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गोकुळ तायडे करीत आहे.
दुसर्या गटाकडून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
बामणोद गावातील न्हावी दरवाजाकडून बस स्टॅण्डकडे जाणार्या रस्त्यावर चेतन अनिल सोनवणे व तेजस कैलास सोनवणे या दोघांना काही एक कारण नसताना आदेश राजेंद्र केदारे, शुभम उर्फ राणे सोनवणे, गोपाल भालेराव यांचा मुलगा, चेतन कैलास केदारे व राहुल मनोज केदारे (सर्व राहणार बामनोद) यांनी मारहाण केली व फायटरने दुखापत केली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात पाच जणाविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक उमेश चौधरी करीत आहे.
