भाजपा नगरसेविकेच्या घरात घुसून गुलाल फेकला : पाच जणांविरुद्ध गुन्हा
भुसावळात राजकारण पेटले : बाजारपेठ पोलिस ठाण्यात भाजपा-राष्ट्रवादी पदाधिकार्यांमध्ये हमरी-तुमरी
भुसावळ : भुसावळातील प्रभाग क्रमांक 24 च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार दुर्गेश ठाकूर निवडून आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी काढलेल्या मिरवणुकीनंतर काही कार्यकर्त्यांनी भाजपा नगरसेविका सोनल रमाकांत महाजन यांच्या घरात अनधिकृतरीत्या प्रवेश करीत शिविगाळ करून गुलाल फेकल्याची घटना शुक्रवारी दुपारी दिड वाजता घडली. या प्रकरणी नगरसेविका सोनल महाजन यांच्या फिर्यादीनुसार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेनंतर भाजपा व राष्ट्रवादीचे पदाधिकारी बाजारपेठ पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्यांची निरीक्षकांच्या दालनातही चांगलीच खडाजंगी झाली.
पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
भाजपा नगरसेविका सोनल महाजन यांच्या फिर्यादीनुसार जामनेर रोडवरील शिव कॉलनीत शुक्रवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास नगरसेवक दुर्गेश ठाकूर हे विजयी झाल्याने कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली असता संशयीत आरोपी मनोज धनराज चौधरी (शिव कॉलनी, भुसावळ), सॅक जीमचा संचालक पवन अरविंद चौधरी (विकास कॉलनी, भुसावळ), राहुल रवींद्र वाघ (स्वामी समर्थ कॉलनी, भुसावळ), जगदीश धोंडू वाघ (दिनदयाल नगर, भुसावळ), भूषण वराडे (पूर्ण नाव माहित नाही) यांनी घोषणाबाजी व शिवीगाळ करीत घरात प्रवेश करून गुलाल फेकत दहशत माजवली.
बाजारपेठ पोलिस ठाण्यातही वादंग
घडलेल्या घटनेची तक्रार देण्यासाठी नगरसेविका महाजन या पती बापू महाजन, नगरसेवक युवराज लोणारी आदींसह बाजारपेठ पोलिस ठाण्यात आल्यानंतर निरीक्षक दिलीप भागवत यांच्या दालनात राष्ट्रवादीचे नगरसेवक उल्हास पगारे व नगरसेवक लोणारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याने उभयतांना दालनाबाहेर काढण्यात आले. तर या प्रकारानंतर राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, नितीन धांडे, आशिक खान शेरखान तसेच भाजपातर्फे नगरसेवक किरण कोलते, शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, माजी शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व नगरसेवकांनी धाव घेतली.

