साकळीत 14 जानेवारीपासून अखंड हरीनाम संकीर्तन सप्ताह
यावल : तालुक्यातील साकळी येथे सालाबादाप्रमाणे साकळी ग्रामस्थ व श्री संत ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळ यांच्यावतीने 14 ते 21 जानेवारी 2020 दरम्यान अखंड हरीनाम संकीर्तन सप्ताह व श्रीमद् रामायण चरीत्र पारायण या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून हा सप्ताह भवानी माता मंगल कार्यालयात होणार आहे. या सप्ताहादरम्यान श्रीमद् रामायण चरीत्र वाचक ह.भ.प.नितीन महाराज (पाडळसेकर) हे श्रीमद् रामायण चरीत्राचे वाचन करणार आहे. त्याचप्रमाणे सप्ताहात दररोज रात्री कीर्तन होणार आहे. यात मंगळवार, 14 रोजी ह.भ.प.सुभाष महाराज (भालोद), 15 रोजी ह.भ.प.नारायण महाराज (कानळदा), 16 रोजी ह.भ.प.मनोज महाराज (दुसखेडा), 17 रोजी ह.भ.प.समाधान महाराज (रिंगणगाव), 18 रोजी ह.भ.प.हेमंत महाराज (नांद्रे), 19 रोजी ह.भ.प.अंकुश महाराज (मनवेल), 20 रोजी ह.भ.प.मनोज महाराज (पिंप्राळा), 21 रोजी ह.भ.प.भरत महाराज (म्हैसवाडी) यांचे सकाळी नऊ वाजता काल्याचे कीर्तन होईल. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, 20 रोजी दुपारी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या संकीर्तन सप्ताहादरम्यान दररोज विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे. यात सकाळी भल्या पहाटे काकडा आरती, दुपारी श्रीमद् रामायण चरीत्राचे वाचन व रात्री कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. दररोज कीर्तनादरम्यान साकळीसह शिरसाड, मनवेल, पिळोदा, थोरगव्हाण, पथराळे, शिरागड, नावरे, दहिगाव,किनगांव चिंचोली व धानोरा येथील भजनी मंडळाचे सहकार्य मिळणार आहे. ग्रामस्थांच्यावतीने अखंड हरीनाम संकीर्तन सप्ताह गेल्या सलग चौदा वर्षापासून आयोजित करण्याची परंपरा असून यंदाचे यंदाचे पंधरावे वर्ष आहे. अखंड हरीनाम व संकीर्तन सप्ताहाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

