आयआयटी मुंबईत ‘तानाजी’चाच डंका


श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीत विजयी संघाचा सत्कार

भुसावळ : आयआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट’मधील ‘रोबो वॉर’ स्पर्धेत भुसावळच्या श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील ब्लँका बोट्झ संघाच्या ‘तानाजी’ने ओदिशाच्या वायपर रोबोटला धोबीपछाड देत दुसर्‍यांदा स्पर्धा जिंकली. रोबोटिक्स स्पर्धेत भुसावळच्या विद्यार्थ्यांनी वर्चस्व कायम ठेवत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भुसावळचे नावलौकिक केले. यावेळी ‘हर हर महादेव’, ‘जय भवानी जय शिवाजी’च्या गजरात रोबोप्रेमी विद्यार्थ्यांनी ‘तानाजी’चं कौतुक केलं. 60 किलो वजनी गटात प्रथम येण्याचा मान पटकावत अनेक विक्रम मोडणार्‍या ब्लँका बोट्झ संघाचा महाविद्यालयात प्राचार्य डॉ. आर.पी.सिंह, डीन डॉ.राहुल बारजिभे, डॉ.गिरीश कुलकर्णी, प्रा.सुधीर ओझा, प्रा.अविनाश पाटील, प्रा.अजित चौधरी, प्रा.दिनेश पाटील, प्रा.जितेंद्र चौधरी, प्रा.नितीन खंडारे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

असा मिळवला विजय
प्राथमिक फेरीत 24 सेकंदांत प्रतिस्पर्धी रोबो गारद केले. उपांत्य फेरीमध्ये अवघ्या 9 सेकंदात प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा उडवला. अंतिम सामन्यात केवळ 52 सेकंदात स्पर्धकाचा फडशा साफ केला. गेल्या दहा वर्षांपासून आम्ही ‘रोबो वॉर’च्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेत आलो आहोत. ‘ब्लँका बोट्झ’ टीमनं आजपर्यंत देश-विदेशातल्या स्पर्धा जिंकल्या आहेत. यावेळी आम्हाला ‘जनरल’शी लढता आलं नाही. पण, लवकरच आम्ही त्याच्याशी लढू असे संघ नायक अक्षय जोशी याने सांगितले.

अमेरिकेत ‘बॅटल बोट’ स्पर्धेत सहभागी होणार:
आयआयटीच्या ‘टेकफेस्ट’मध्ये ‘तानाजी’नं इतर स्पर्धकांना धूळ चारत गड राखला आहे. ‘रोबो वॉर’ या स्पर्धेमध्ये धडाकेबाज कामगिरी बजावत तो सरस ठरला. अमेरीकेमध्ये होणार्‍या ‘बॅटल बोट’ स्पर्धेत त्यांना सहभागी व्ह्यायचं असून त्यासाठी टीमनं 110 किलोचा रोबो बनवला आहे. आयोजकांनी या टीमला खास निमंत्रण दिलं आहे. हिंदी सेवा मंडळ व श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी ही अभिमानाची बाब आहे, असे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !