वर्षभर नियमित कर भरणार्‍यांना दळण मोफत


भास्कर पेरे पाटील : भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात व्याख्यान

भुसावळ : आमच्या गावाचा विकास होण्यासाठी आम्ही स्वतः जबाबदार आहोत. ज्यावेळी सरकारला स्मार्ट विलेज योजनेबाबत प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळेस देशातील 11 गावांचा अभ्यास करण्यात आला व त्यात माझ्या गावाचाही समावेश होता व माझ्याच गावाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. खर्‍या जीवनाची गुरुकिल्ली प्यायचं स्वच्छ पाणी, फळांची झाडे लावा, सांडपाणी जमिनीत जिरवा, साफसफाई आणि शिक्षण या या पाच गोष्टी ज्यांनी पाळल्या तेच खर्‍या अर्थाने पुढे जाऊ शकतात, असा आशावाद आदर्श गाव पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी व्यक्त केले. प.क.कोटेचा महिला महाविद्यालय व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यांची विचार मंचावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा पद्मा कोटेचा होत्या. प्रमुख पाहुणे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श गाव पाटोदा, जि.औरंगाबाद येथील सरपंच भास्करराव पेरे-पाटील होते, गटविकास अधिकारी विलास भाटकर, निरंजना शहा, प्राचार्य डॉ.मंगला साबद्रा यांची उपस्थिती होती. पर्यवेक्षक आर.बी.भदाणे यांनी प्रास्ताविक केले. गटविकास अधिकारी विलास भाटकर यांनी आपल्या भाषणात ग्रामविकास, स्वच्छता विषयी मार्गदर्शन केले.

वर्षभर कर भरणार्‍यांना दळण फ्री
भास्कर पेरे पाटील म्हणाले की, आमच्या गावात दरवर्षी एक एप्रिलला सर्व शेतकरी टॅक्स भरतात. त्या बदल्यात आम्ही त्यांना साधे पाणी, नळाचे पाणी, अ‍ॅक्वाचे पाणी आणि पहाटे पाच ते आठ गरम पाणी देतो. त्याचप्रमाणे सर्वांनी टॅक्स भरावा म्हणून आम्ही एक योजना केली, ती म्हणजे पिठाची गिरणी. जे टॅक्स वेळेवर भरतात त्यासाठी वर्षभर दळण फ्री त्यामुळे आमच्या गावात सर्वांनी टॅक्स भरण्यासाठी रांग लावली. त्यानंतर आम्ही महिलांसाठी मसाला गिरणी, पापड गिरणी, आणि सर्व गावासाठी वायफाय सुविधा सुरू केली शिवाय प्रत्येकाच्या घरून आम्ही कचरा उचलतो. ग्रामपंचायतीचा पहिला कर जो भरेल त्यास ध्वजारोहणाचा मान दिला जातो.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमास निरंजना शहा, नंदलालजी मंडलेचा, जयंती सुराणा, शिरीष नाहाटा, महेंद्र चोरडीया, विना लाहोटी, आर.बी.फेगडे, स्वप्निल आदीवाल, उपप्राचार्य डॉ.जनार्दन धनवीज, सरपंच, ग्रामसेवक, विविध पदाधिकारी, ज्येष्ठ नागरीक संघाचे सभासद आणि विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रा.आर.एच.पाटील तर आभार उपप्राचार्य डॉ.शिल्पा पाटील यांनी मानले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !