गारबर्डी वनक्षेत्रात अतिक्रमण हटवताना पथकावर दगडफेक : जेसीबी चालकासह तिघे जखमी
32 संशयितांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा : अखेर अतिक्रमण हटवले
Stone pelted on team while clearing encroachment in Garbardi forest area: Three injured including JCB driver रावेर : तालुक्यातील गारबर्डी वनक्षेत्रात आदिवासींनी वनविभागाच्या वनपालासह तिघांवर दगडफेक केल्याची घटना मंगळवारी रात्री 12 वाजता घडली होती. त्यानंतर महसूल, पोलीस प्रशासन व वन विभागाच्या अधिकार्यांच्या उपस्थितीत गुरुवारी 168 अधिकार्यांचा ताफा अतिक्रमण हटवण्यासाठी धडकल्यानंतर पुन्हा आदिवासींनी पाच जेसीबी मशीनवर दगडफेक केल्याने चार लाखांचे नुकसान झाले तर जेसीबी चालक सुनील पमील बारेला, वनरक्षक सुनील हरीभाऊ गौंड, वनरक्षक भैय्यासाहेब गायकवाड दगडफेकीत जखमी झाले. या प्रकरणी 32 संशयितांविरोधात रावेर पोलिसात रावेर वनपाल रवींद्र सोनवणे यांच्या फिर्यादीवरून 32 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दगडफेकीत पुन्हा तिघे जखमी
गारबर्डी गावाजवळील कक्ष क्रमांक 25 मध्ये अतिक्रमण झाल्यानंतर मंगळवारी पथक गेल्यानंतर आदिवासींनी दगडफेक केल्यानंतर गुरुवारी पुन्हा सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे, तहसीलदार बी.ए.कापसे, परीक्षीक्षाधीन तहसीलदार मयूर कळसे, रावेरचे सहाय्यक निरीक्षक शीतलकुमार नाईक, रावेर वनपरीक्षेत्र अधिकारी अजय बावने, यावल पूर्व वनपरीक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांच्यासह 168 अधिकारी व कर्मचार्यांचा ताफा जेसीबी मशीन घेवून अतिक्रमण हटवण्यासाठी दाखल झाल्यानंतर जेसीबीद्वारे नांगरटी केलेल्या क्षेत्रात खोल चर खोदण्यात येत असताना 70 ते 80 आदिवासींनी उंचावरून जेसीबी मशीनवर दगडफेक सुरू केल्याने जेसीबीच्या काचा फुटल्याने सुमारे चार लाखांचे नुकसान झाले तर जेसीबी चालकासह तिघे जखमी झाले.
अधिकार्यांच्या बंदोबस्तात हटले अतिक्रमण
अतिक्रमण धारकांचा संताप काहीसा ओसरल्यावर फैजपूर उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे यांनी आदिवासी बांधवांशी चर्चा करीत हे शासकीय काम असल्याचे समजावून सांगितल्यानंतर अतिक्रमण केलेल्या झोपड्या नष्ट करण्यात आल्या तसेच आठ ते दहा हेक्टर नांगरलेल्या जमिनीवर जेसीबीद्वारे समतल चोर खोदण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी 32 संशयितांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
