प्रशासकीय सेवा हे समाजसेवेचे एक माध्यम -श्यामसुंदर पाटील
सार्वजनिक कीर्तन महोत्सवात विविध क्षेत्रातील व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान
भुसावळ : प्रशासकीय सेवा हे समाजसेवेचे एक माध्यम आहे. खान्देशातील तरुणांनी या सेवेसाठी स्पर्धा परीक्षेकडे वळावे, असे आवाहन राज्याच्या महसूल व वन विभागाचे सहसचिव श्यामसुंदर पाटील यांनी तरुणांना केले. शहरातील आपले परीवार सार्वजनिक वाचनालय व सद्गुरु धनजी महाराज प्रतिष्ठान तर्फे शनिवारी आयोजित सर्वजनिक कीर्तन महोत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या व्यक्तींच्या ‘गौरव पुरस्कार’ वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमास माजी खासदार व भाजप जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता, लेखक धनंजय कोल्हे, प्रा.डॉ.सुनील नेवे, सुधीर पाटील, महेश चिरमाडे, शुभांगी सरोदे, मंगला पाटील, प्रमोद नेमाडे, दिनेश नेमाडे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कष्टाळू विद्यार्थ्यांना दिशा दाखवण्याची गरज
श्यामसुंदर पाटील पुढे म्हणाले की, आपल्या तालुक्यातील तसेच खान्देशातील आई-वडिलांना आपल्या मुलाने इंजिनिअर किंवा डॉक्टर व्हावे असे वाटते वास्तविक या भागातील मुले कष्टाळू आहेत त्यांच्यात क्षमता आहे ते आपल्या विचारा पलीकडे जाऊन करीअर निवडू शकतात त्यांना दिशा दाखवण्याची गरज आहे तसेच जळगाव जिल्हा व भुसावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात राज्याला शिक्षक वर्ग दिला आहे मात्र प्रशासकीय सेवेत आजही या भागातील तरुणांची संख्या कमी आहे कारण त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव असल्याचे दिसून येते. यावेळी माजी खासदार हरीभाऊ जावळे, रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता, व्ही.आर.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
पेपरच्या कात्रणांनी मिळाली जीवनाला दिशा
मी भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द या गावात राहणारा होतो. प्राथमिक शिक्षण तेथे झाले पुढे जामनेरच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत असतानाच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रवेश मिळवण्यासाठी औरंगाबादमध्ये क्लास असल्याची माहिती पेपरच्या एका कात्रणामुळे मला मिळाली आणि माझ्या जीवनात बदल घडून आला. माझा मुलगा मोठा झाल्यावर माझ्या पत्नीने देखील एका पेपर मध्ये आलेले कात्रण त्याला दिलाने त्या माहितीच्या आधारावर त्याच्या जीवनात बदल घडून आला. ज्येष्ठ नागरीकांनी किंवा आई वडिलांनी पेपर वाचताना त्यातील काही जाहिरातीवाचून त्या कापून युवकांना दिल्यास त्यांच्या जीवनातही बदल घडून येईल, असे श्यामसुंदर पाटील म्हणाले.
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार
यावेळी सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या संघटना, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व पत्रकार यांना यांचा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच गुजरात मधील शुभांगी सरोदे यांनी संत ज्ञानेश्वरांवर आधारीतएक पात्री प्रयोग सादर केला.
आपले परीवार सार्वजनिक वाचनालयाचे सचिव शांताराम पाटील यांनी प्रास्ताविक केले. ह.भ.प.दीदपक महाराज यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप भारंबे, मुरलीधर पाटील आदींनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.

