मी रेल्वेत चढल्यास अवैध धंदे बंद पाडणार
भुसावळात रेल्वे प्रशासनाला पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा सूचक इशारा : पाळधीच्या शेंगदाणे विक्रेत्यांना रेल्वे सुरक्षा बलाने त्रास दिल्यास गाठ माझ्याशी
भुसावळ : चुकीच्या कामासाठी मी कधीही आपल्याकडे येणार नाही मात्र मी पत्र दिल्यावरही पाळधीच्या शेंगदाणे विक्रेत्यांवर पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाकडून कारवाई होत असेल तर हे बरोबर नाही व यापुढे या गोरगरीब विके्रत्यांवर कारवाई झाल्यास मी माझ्या स्टाईलने काम करेल, असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी डीआरएम यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दिल्याने अधिकार्यांमध्ये खळबळ उडाली. मला रेल्वेत चढण्यास भाग पाडू नका, अन्यथा सर्व अवैध धंदे बंद करून दाखवेल, असा इशाराही त्यांनी देवून टाकला. पाळधी ते अमळनेर पॅसेंजरमध्ये शेंगदाणे विके्रत्यांना आरपीएफकडून त्रास दिला जात असून रेल्वेच्या नियमानुसार विक्रेत्यांना हॉकर्सचे परवाने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. शेंगदाणे विक्री बंद झाल्यास या विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ येवून बेरोजगारी वाढेल, असेही ते म्हणाले. प्रसंगी नगरसेवक मनोज बियाणी सोबत होते.

