मुक्ताईनगरात गॅस सिलिंडरचे गोदाम फोडून अडीच लाखांचे सिलिंडरसह रेग्युलेटर लांबवले
Gas godown in Mahalkheda Shivara was broken : goods worth 2.5 lakhs looted भुसावळ : मुक्ताईनगर तालुक्यातील महालखेडा शिवारातील सुदीप एच.पी.कंपनीचे गॅस गोदाम फोडून चोरट्यांनी गॅस सिलिंडरसह शेगड्या व गॅस रेग्युलेटर असा एकूण अडीच लाखांचा मुद्देमाल लांबवल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद गोदामातून लाखोंचे साहित्य लांबवले
महालखेडा शिवारातील शेत गट क्रमांक 38 मध्ये सुदीप एच.पी.गॅस एजन्सीचे गोदाम आहे. बंद गोदामाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करीत 71 गॅस सिलिंडरसह रेग्यूलेटर अन्य महत्त्वाच्या वस्तू मिळून दोन लाख 13 हजार रुपये किंमतीचे साहित्य लंपास केले. ही चोरी शनिवार, 6 मे रोजी सायंकाळी साडेसहा ते रविवारी सकाळी साडेसात दरम्यान झाली. चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर सहाय्यक व्यवस्थापक सुनील वसंतराव पाटील (42, नांदवेल, ता.मुक्ताईनगर) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहू करीत आहेत.
अडीच लाखांचे साहित्य लांबवले
चोरट्यांनी सुदीप गॅस एजन्सीच्या गोदामातून आठ हजार रुपये किंमतीचे एच.पी.कंपनीचे सिलिंडर, 19 हजार 200 रुपये 96 रेग्युलेटर, सात हजार रुपये किंमतीचा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा खोका, दोन लाख 13 हजार रुपये किंमतीचे 71 एच.पी.सिलिंडर असा एकूण दोन लाख 47 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला.
