मित्री मंत्रालयात आलेल्या नागरीकांना सन्मानपूर्वक वागणूक द्या
रावेरचे नूतन पंचायत समिती सभापती जितू पाटील यांच्या अधिकार्यांना कानपिचक्या
रावेर : पदाधिकारी वा नागरिक कामानिमित्त पंचायत समितीत आले असता त्यांच्याशी निट बोला व त्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्या, अशा कानपिचक्या नूतन सभापती जितु पाटील यांनी मिनी मंत्रालयातील अधिकार्यांना दिल्या.
सभापती, उपसभापती निवडीनंतर सोमवारी पंचायत समितीची आढावा सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जितु पाटील होते. व्यासपीठावर उपसभापती पी.के.महाजन, सदस्य दीपक पाटील, योगेश पाटील, जुम्मा तडवी, माधुरी नेमाडे, प्रतिभा बोरोले, कविता कोळी, योगिता वानखेडे, गटविकास अधिकारी डॉ.सोनिया नाकाडे उपस्थित होत्या.
तक्रारींचे जागेवरच निरसन
ऐनपूर वीज उपकेंद्रातून जाणार्या भामलवाडी फिडरवर सात गावांचा भार असतांना त्यात पुन्हा धामोडी जोडल्याने वीजपुरवठा करणार्या ट्रान्सफार्मरवर अतिरीक्त भार आल्याने दररोज दोन तासांपर्यंत वीज खंडित होत असल्याची तक्रार सदस्य दीपक पाटील यांनी केल्यानंतर या ट्रान्सफार्मरची क्षमता वाढवावी अशा सूचना सभापतींनी केल्या. वीज वितरण कंपनीचे प्रमुख अधिकारी सभेला उपस्थित नसल्याने दीपक पाटील यांनी नाराजी व्यक्त करीत उंटावरून शेळ्या हाकणे बंद करा, नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा सभेत दिला. शासकीय कामे व शासकीय योजनांच्या बांधकामांना वाळू मिळत नसल्याने ही बांधकामे बंद पडली असून तहसीलदारांकडून परवाना दिला जात नसल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी सांगितल्यावर तहसीलदारांना शासकीय बांधकामांसाठी परवाने देण्या संदर्भात पत्र देण्याच्या सूचना सभापती पाटील यांनी दिल्या.

