भुसावळातील खरात हत्याकांडातील संशयिताच्या नावाने व्यापार्यांना धमकावून मागितली खंडणी
भुसावळातील व्यापारीवर्गात घबराट : राजा मोघेसह तिघांविरोधात शहर व बाजारपेठेत गुन्हा दाखल
In the name of Kharat massacre suspect in Bhusawal, traders were threatened and demanded ransom भुसावळ : राज्यात गाजलेल्या शहरातील खरात हत्याकांडातील संशयित आरोपी राजा मोघे याच्या नावाने आलेल्या दोन हस्तकांनी शहरातील दोन व्यापार्यांकडे मंगळवारी दुपारी खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राजा मोघेसह अन्य दोघा अनोळखीविरोधात शहर व बाजारपेठ पोलिसात दोन व्यापार्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे मोघे हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याची नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली असून मंगळवारी त्यास न्यायालयीन तारखेवर आणल्यानंतर हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
दोन व्यापार्यांकडे मागितली खंडणी
शहरातील गोपी मॉलचे रवी झामनानी व गुजराथी स्वीटचे कपिल शर्मा यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी दुपारी 1.20 ते दोन वाजेच्या सुमारास तोंडाला रूमाल बांधून आलेल्या दोन तरुणांनी मोबाईलवरून फोन लावून भाई बोल रहे म्हणत फोन दिला असता समोरील व्यक्तीने मै राजा मोघे बोल रहा हु, आपको दुकान चलाना है तो मुझे पैसे देना पडेगा. गुजराथी यांच्याकडे दहा हजार व झामनानी यांच्याकडे 20 हजारांची खंडणी मागण्यात आल्याचा आरोप व्यापार्यांनी केला आहे. गुजराथी यांनी पैसे नसल्याचे सांगून आलेल्या दोघा पंटरांना मी कोर्टात येत असल्याचे सांगितल्यानंतर संशयित निघून गेले. ही बाब मेहता यांनी शहरातील व्यापार्यांना सांगताच व्यापारी व माजी नगरसेवक निर्मल कोठारी, गुड्डू अग्रवाल, अजय नागराणी, शाम दरगड, रवी झामनानी, विशाल अग्रवाल, ब्रिजेश लाहोटी, विजय मोहनानी, देवा वाणी, संजय सुराणा, प्रसन्न पांडे आदी व्यापार्यांनी शहर पोलिसात धाव घेतली. यावेळी नव्याने रूजू झालेले सहायक पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांना घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली. यावेळी जळगावचे आमदार सुरेश भोळे हे शहरात आल्यानंतर त्यांनीदेखील व्यापार्यांची भेट घेत पोलिसांना कडक कारवाईच्या सूचना केल्या.
पाच संशयितांना बंदोबस्तात आणले तारखेवर
राज्यात गाजलेल्या शहरातील खरात हत्याकांडातील चार संशयित नाशिक कारागृहात तर एक संशयित जळगाव कारागृहात असून त्यांना मंगळवारी दुपारी भुसावळ सत्र न्यायालयात आणण्यात आले मात्र न्यायालय सुटीवर असल्याने या खटल्यात संशयिताना 30 मे ही पुढील तारीख देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
फोनवर बोलणारा संशयित कोण?
व्यापार्यांच्या आरोपानुसार, दुकानात आलेल्या दोघा संशयितांनी फोनवर राजा मोघे बोलत असल्याची बतावणी केली मात्र हत्याकांडातील पाचही संशयितांना पोलीस वाहनातून न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर पोलिसांचा न्यायालयात प्रचंड खडा पहारा होता यामुळे संशयित आरोपींच्या फोनवरून बोलणारा संशयित नेमका कोण ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. पोलिसांच्या ताब्यात असताना हा प्रकार घडला असल्यास बंदोबस्तावरील व न्यायालयात आणणार्या कैदी पार्टी पोलिसांच्या अडचणीत वाढ होईल यात शंकाच नाही मात्र तसे नसल्यास मोघे याच्या नावाने खंडणी मागणारा संशयित कोण? याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.
