कळमसरा गावातील 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

Suicide of a 22-year-old married woman in Kalamsara village अमळनेर : तालुक्यातील कळमसरा येथील 22 वर्षीय विवाहितेने घरी कुणी नसतान गळफास घेत आत्महत्या केली. रोहिणी प्रमोद निकम (22) असे मयत विवाहितेचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी एक वाजता घडली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. रोहिणी या विवाहितेने शुक्रवारी राहत्या घरात स्वयंपाक घराच्या खोलीत छतावरील पंख्याला ओढणीने बांधून गळफास घेतला.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
कळमसरे येथील रहिवासी प्रमोद बापू निकम यांचा ग्राहक सेवा केंद्राचा व्यवसाय असून ते शुक्रवारी दुपारी एक वाजता घरी आल्यानंतर त्यांना दरवाजा लावलेला आढळल्याने त्यांनी पत्नीला हाक मारली मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी मागील बाजूस जावून पाहिले असता पत्नीने छताच्या पंख्याला गळफास घेतल्याचे दिसताच त्यांनी आरडा-ओरड केल्याने शेजारील नागरीक जमा झाले. रोहिणी यांना तत्काळ खाली उतरवून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टर प्रमोद निकम यांनी तपासून मृत घोषित केले. मयत रोहिणी यांच्या पश्चात दोन वर्षाचा मुलगा आहे. विवाहितेने टोकाचे पाऊल का उचलले ? याची माहित कळू शकली नाही. या प्रकरणी प्रमोद निकम यांनी मारवड पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद पाटील करीत आहेत.




