बोदवडमध्ये सैन्य भरतीसाठी विनामूल्य नोटरी सेवा
बोदवड : शहरातील अॅड.अर्जुन पाटील यांची नुकतीच भारत सरकार नोटरीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी सैन्यात जाणार्या तरुणांसाठी मोफत नोटरीची सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. बोदवड शहरात नोटरी ची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे सैन्य भरतीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा वाचत आहे. सैन्य भरतीसाठी फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांना फॉर्मवर नोटरी शपथपत्र करावे लागते मात्र शहरात ही सुविधा नसल्याने तरुणांना अन्य गावांमध्ये जावे लागत असल्याने त्यात वेळेसह पैसाही खर्च होत होता मात्र समाजाचे देणे लागतो या भावनेतून अॅड.अर्जुन पाटील तरुणांसाठी नोटरीची सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे. या सेवेचा सैन्यभरतीसाठी जाणार्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा , असे आवाहनही त्यांनी केले आहे.
बोदवड तालुक्यात पहिल्या नोटरीचा मान
अॅड.पाटील यांच्या रूपाने तालुक्यात पहिली नोटरी लाभली असून समाजाप्रती असलेले देणे त्यांनी सैन्य भरतीच्या विद्यार्थ्यांना मोफत सेवा देऊन व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे फॉर्म भरणे व प्रिंटिंग करून देणे त्याचवेळेस नोटरी करून देणे, त्यांना नॉन जुडिशिअल स्टॅम्प उपलब्ध करून देणे, तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली भरती पूर्व प्रशिक्षण देणे, विद्यार्थ्यांना मैदानी सराव या सर्व सेवा व सुविधा एकाच दालनातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. अॅड.अर्जुन पाटील हे यापूर्वी स्टडी सर्कल एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे जळगाव शाखेचे केंद्रप्रमुख होते त्यामुळे त्यांच्या ज्ञानाचा फायदा बोदवड तालुका व परीसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी होणार आहे. यासाठी दर रविवारी विनामूल्य संडे बॅच सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.



