अल्पवयीन बालकांचे लैंगिक शोषण केल्यास आजीवन कारावास
अॅड.प्रफुल्ल पाटील : नाहाटा महाविद्यालयात भूगोल सप्ताह
भुसावळ : लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी पोस्को या कायद्याची निर्मिती झाली असून 18 वर्षा खालील मुला-मुलींचे जर लैंगिक शोषण होत असल्यास अशा गुन्हेगारांना आजीवन कारावासाच्या शिक्षेची तरतूद या कायद्यात करण्यात आली असून त्यासाठी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणे गरजेचे असल्याचे मत, अॅड.प्रफुल्ल पाटील यांनी व्यक्त केले. भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील भूगोल शास्त्र मंडळ आयोजित भूगोल सप्ताह अंतर्गत शनिवारी ‘गर्भ धारणापूर्व आणि जन्मपूर्व लिंग निदान प्रतिबंध कायदा आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकाचे संरक्षण कायदा’ या विषयावर अॅड. पाटील बोलत हेाते.
लैंगिक शोषण केल्यास आजीवन कारावास
अॅड. प्रफुल्ल पाटील म्हणाले की, पोस्कोच्या कायद्यात कठोर आरोपीला शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. 18 वर्षाखालील अल्पवयीन बालक-बालिकांना त्यांच्या इच्छेविरुद्ध कुणी स्पर्श केला असल्यास संबंधितांनी पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर आरोपीला आजीवन कारावासही घडू शकतो. हे गुन्हे कसे घडतात व हे गुन्हे घडू नये म्हणून कोणत्या उपाययोजना कराव्यात याविषयीदेखील त्यांनी मार्गदर्शन केले.
यांची प्रमुख उपस्थिती
यावेळी प्रा.डॉ.रेखा गाजरे, भूगोल विभाग प्रमुख प्रा.व्ही.पी.लढे, भूगोल सप्ताह समन्वयक प्रा.अनिल हिवाळे, प्रा.प्रशांत पाटील, प्रा.अजय तायडे, प्रा.मीनाक्षी बेदरकर, प्रा.जितेंद्र पाटील यांची उपस्थिती होती.
गर्भ लिंग निदान कायद्याने गुन्हा
प्रसंगी अॅड.जया झोरे म्हणाल्या की, गर्भधारणापूर्व किंवा जन्मापूर्व लिंग निदान करणे हा कायद्याने गुन्हा असून हा कायदा 1986 साली अस्तित्वात आला असलातरी अनेक नागरीक या कायद्याकडे दुर्लक्ष करतात व गर्भ लिंग निदान करतातच हे अतिशय निंदनीय कृत्य आहे व त्यामुळे दिवसागणिक मुलींचे प्रमाण घटत असल्याची बाब खेदनजक असल्याचे अॅड.झोरे म्हणाल्या. या कायद्याविषयी जास्तीत-जास्त जागरुकता करणे गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या. गर्भपात म्हणजे काय, भृणहत्या म्हणजे काय या विषयीच्या संकल्पना त्यांनी समजावून सांगितल्या.
समाज जागृतीसाठी कार्यक्रमांची गरज
डॉ.गाजरे यांनी अशा पद्धतीचे कार्यक्रम समाजात वेळोवेळी आयोजित व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली व आपणाकडून अशा प्रकारचे चुकीचे वर्तन होऊ नये व याविषयी खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले. कायद्याला साहित्याची जर जोड लागली तर कायदे चांगल्या पद्धतीने समजावून सांगता येतील, असेही त्या म्हणाल्या. सूत्रसंचालन हर्षाली चिकाटे तर आभार सारंग नकवाल यांनी मानले. प्रमुख पाहुण्यांचा परीचय तुषार भोगे आणि प्रास्ताविक भूगोल सप्ताह समन्वयक प्रा.अनिल हिवाळे यांनी केले.

