भुसावळ विभागात अवैध विक्रेत्यांसह दलाल रेल्वे सुरक्षा बलाच्या रडारवर
भुसावळ : धावत्या गाडीची चेन पुलिंग, बेकायदेशीर तिकीट, अनधिकृत फेरीवाले आणि मद्य आणि तंबाखूजन्य पदार्थांसह प्रवास करणार्यांविरूध्द रेल्वे सुरक्षा बलातर्फे धडक कारवाई करण्यात आली. मध्य रेल्वेच्या नागपूर, भुसावळ, मुंबई, पुण व सोलापूर या पाचही विभागात रेल्वे सुरक्षा बलातर्फे ही दंडात्मक कारवाई करण्यात आली. भारतीय रेल्वेत मोठ्या प्रमाणावर वाढलेली गुन्हेगारी, चोर्या, चेन पुलींग, अनधिकृत तिकीट विक्री करणार्या 52 दलालांवर कारवाई करण्यात आली. विविध कलमान्वये रेल्वे सुरक्षा बलातर्फे धडक कारवाई रेल्वे सुरक्षा बलातर्फे केली जात आहे. मध्य रेल्वेच्या पाचही विभागातील रेल्वे सुरक्षा बल यंत्रणा सक्रीय झाली आहे. मे महिन्यात रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी राहात असल्याने गर्दीचा फायदा घेत चोर्या करणे, गर्दीचा फायदा घेत फुकट प्रवास करणे, अनधिकृतरीत्या गाडीत खाद्य पदार्थ विक्री करणे आदी कारणास्तव आरपीएफकडून कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई भविष्यात सुध्दा सुरूच राहणार आहे.
मे महिन्यात अशी झाली कारवाई
भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम 141 अन्वये अनधिकृत अलार्म चेन पुलिंगच्या 941 प्रकरणांची नोंद करण्यात येवून 711 प्रवाशांना अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून एक लाख 71 हजार 205 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम 143 अन्वये, बेकायदेशीर तिकिटांची 49 प्रकरणे नोंदवण्यात आली आणि 52 दलालांवर कारवाई करण्यात आली. भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम 144 (1) अंतर्गत अनधिकृत फेरीवाले दोन हजार 741 प्रकरणे नोंदवण्यात आली. दोन हजार 729 अनधिकृत फेरीवाल्यांना अटक करून त्यांच्याकडून 17 लाख 27 हजार 580 ीुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आरपीएफकडून एक लाख 19 हजार 680 रुपये किंमतीच्या अवैध दारूच्या 363 बाटल्या जप्त करण्यात आल्या तसेच चार जणांना अटक करण्यात आली. 64 किलो वजनाची आणि 84 हजार रुपये किंमतीची अवैध तंबाखू उत्पादनांची 14 पाकिटे जप्त करण्यात आली.
