रावेर पोलिसांनी गुरांची अवैध वाहतूक रोखली ; 18 म्हशींची सुटका ; त्रिकूट जाळ्यात
Raver police stopped illegal movement of cattle ; Rescue of 18 buffaloes ; In a triple net रावेर : रावेर पोलिसांनी पालजवळील शेरी नाक्यावर आयशर वाहनातून अवैधरीत्या गुरांची वाहतूक होताना कारवाई करीत 18 म्हशींची सुटका केली तर तिघांना या प्रकरणी अटक करण्यात आली. ही कारवाई सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईने जनावरांची अवैधरीत्या वाहतूक करणार्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
शेरी नाक्यावर रोखली अवैध गुरांची वाहतूक
पोलीस कॉन्स्टेबल उमेश रमेश नरवाडे यांच्या तक्रारीनुसार, पाल गावाजवळील शेरी नाक्याजवळ आयशर (एम.एच.18 बी.जी.6877) मधून अवैधरीत्या म्हशींची डॉक्टरांच्या प्रमाणपत्राविना व दाटीवाटीने व निदर्यतेने वाहतूक होत असल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांनी आयशर ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणला. वाहनातील सहा लाखांच्या 18 म्हशींची सुटका करून त्यांची गो शाळेत रवानगी करण्यात आली तर पाच लाख रुपयांचे आयशर वाहन जप्त करण्यात आले. या प्रकरणी संशयित रफिक खान मेहराज खान (29, गुलशन नगर, चांदणी चौकाजवळ, खरगोन, मध्यप्रदेश), साकीर सलीम खान (28), काला अकलीम खान (33, दोन्ही रा.खसखसवाडी, खरगोन, मध्यप्रदेश) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संशयिताना अटक करण्यात आली. तपास नाईक किशोर सपकाळे करीत आहेत.
