प्रतिष्ठित टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये भुसावळ रनर्सचा यशस्वी सहभाग
भुसावळ : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व जगप्रसिद्ध टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनच्या धावपटूंनी यशस्वी सहभाग नोंदविला. या स्पर्धेमध्ये देश-विदेशातील 55 हजार 322 धावपटू सहभागी झाले. पूर्ण मॅरेथॉन (42 किमी), अर्ध मॅरेथॉन (21 किमी), ड्रिम रन (10 किमी) व फन रन (सहा किमी) या विविध श्रेणीत महिला व पुरुष अशा वेगवेगळ्या गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. पूर्ण मॅरेथॉनमध्ये नऊ हजार 660 धावपटू, अर्ध मॅरेथॉनमध्ये 15 हजार 260 धावपटू तर 10 किमीमध्ये आठ हजार 32 धावपटू तसेच वरीष्ठ नागरिकांच्या श्रेणीमध्ये एक हजार 22 धावपटू, तर अपंगांच्या स्पर्धेत एक हजार 596 धावपटूंचा समावेश होता. शिवाय आंतरराष्ट्रीय धावपटूंच्या ‘एलाईट रनर्स ’ साठी विशेष स्पर्धा होती.
12 अंश सेल्सिअस तापमानात स्पर्धा
धावपटूंची प्रचंड संख्या बघता वेगवेगळ्या गटासाठी स्पर्धा सुरू होण्याचे ठिकाण वेगवेगळे होते. 42 किमी व 10 किमी स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून तर 21 किमी व सहा किमीची स्पर्धा वरळी येथून सुरू झाली. या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॅबिनेट मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ, आदित्य ठाकरे व अभिनेता टायगर श्रॉफ आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. पहाटे 5.15 वाजता 12 अंश सेल्सिअस तापमानात पूर्ण मॅरेथॉन व अर्ध मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय उत्तम आयोजन व नियोजन यासोबतच मुंबईतील सामान्य नागरीकांचा उत्साह व धावपटूंना मिळणारा पाठिंबा. शिवाय नागरीकांनी उत्स्फूर्तपणे धावपटूंसाठी पाणी, एनर्जी ड्रिंकची व्यवस्था केली होती. या स्पर्धेमध्ये भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनचे धावपटूही सहभागी झाले. त्यात पूर्ण मॅरेथॉनमध्ये प्रवीण फालक, डॉ.तुषार पाटील, तरुण बिरीया तसेच अर्ध मॅरेथॉनमध्ये डॉ.चारुलता पाटील, डॉ.नीलिमा नेहेते, सीमा पाटील, पूनम भंगाळे, संजय भटकर, गणसिंग पाटील, सुधाकर सणांसे, प्रवीण वारके, रणजीत खरारे, डॉ.निर्मल बलके, प्रदीप सोलंकी, प्रवीण पाटील तसेच दहा किलोमीटर अंतरासाठी चारुलता अजय पाटील, मीना नेरकर, भारती पाटील,अनिता पाटील व सहा किलोमीटर रनसाठी नितीन पाटील सहभागी झाले. स्पर्धेत सहभागी झालेल्या धावपटूंचे भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनच्या सदस्यांनी रात्री रेल्वे स्टेशनवर स्वागत केले. याप्रसंगी डॉ. संजय नेहते, श्रीकांत जोशी, दर्शन नागदेव, अशोक पाटील, कल्पेश मनवाणी, अखिलेश कनोजिया, सागर पाटील आदी सदस्य उपस्थित होते.

