मोहलाईसह कोपरगावच्या चोरट्यांकडून चोरीच्या 12 दुचाकी जप्त
चाळीसगाव पोलिसांची कामगिरी : कोपरगाव, सिन्नर, संगमनेरातून लांबवल्या दुचाकी
चाळीसगाव : टाकळीच्या तक्रारदाराची दुचाकी चोरीला गेल्यानंतर शहर पोलिसांनी केलेल्या गोपनीय तपासात मोहलाईसह कोपरगावच्या दुचाकी चोरट्यांनी चाळीसगाव शहरासह कोपरगाव, सिन्नर व संगमनेरातून दुचाकी लांबवल्याची माहिती पुढे आली आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तब्बल 12 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या तर आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे .
गोपनीय माहितीवरून उलगडले गुपित
टाकळी प्र.चा.चे तक्रारदार दीपक हिंमतराव सोनवणे यांची 2 जुलै रोजी 20 हजार रुपये किंमतीची प्लॅटीना (क्र.एम.एच. 41 झेड 3135) चोरट्यांनी लांबवली होती. याबाबत चाळीसगाव शहर पोलिसा 8 जुलै रोजी गुन्हा नोंदवण्यात आला होता. चाळीसगाव शहरात होत असलेल्या दुचाकी चोरींचा तपास लावण्याचे आदेश पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधिक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी उत्तम कडलग यांनी दिले होते. वरीष्ठांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक विजय कुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकातील हवालदार बापूराव भोसले, अभिमान पाटील, राहुल पाटील, विजय शिंदे, प्रेम सिंग राठोड, तुकाराम चव्हाण, प्रवीण सपकाळे, संदीप पाटील आदींनी शहरातील चाळीसगाव नाक्याजवळ विकास देविदास राठोड (27 रा.मोहलाई, ता.पाचोरा, जि.जळगाव) यास ताब्यात घेतल्याने पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर चोरीची कबुली दिली. चोरीसाठी आपला साथीदार मनोज (कोपरगाव) हादेखील मदत करीत असल्याची माहिती आरोपीने देत या दुचाकी आखतवाडे, मोहलाई, वरसेडा, ता.सोयगाव आदी गावातील जवळच्या नातेवाईकांकडे अडचण असल्याचे सांगून गहाण ठेवल्याची कबुली दिल्यानंतर पोलिस पथकानेे 12 दुचाकी जप्त केल्या. जप्त दुचाकींमध्ये चार होंडा शाइन, दोन सीडी डीलक्स, एक ग्लॅमर एफ टी, दोन होंडा युनिकोन, एक फॅशन प्रो, एक टीव्हीएस स्टार, एक ड्रीम युगा असल्याचे सूत्रांनी सांगितले.