Somnath Waghchore ; Not to be such a police officer पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरेंनी उमटला कार्यकर्तृत्वाचा ठसा ! ; आता संगमनेर विभागाची सांभाळताय धूरा


मयूर अंजाळेकर, भुसावळ

Somnath Waghchore ; Not to be such a police officer भुसावळ  : भुसावळ शहर तसे पाहिले तर रेल्वे कामगारांचे शहर व रेल्वेचे सर्वात मोठे जंक्शनही… दोन ऑर्डनन्स फॅक्टरी, दीपनगर निर्मिती प्रकल्प, लष्करी डेपो यामुळेदेखील देशाच्या कानाकोपर्‍यात भुसावळ शहराची वेगळी ओळख आहे मात्र गेल्या काही वर्षांच्या कालखंडात वाढत्या लोकसंख्येसोबत इथल्या गुन्हेगारीनेही डोके वर काढले. अनेक अधिकारी आले अन् बदलीचा कार्यकाळ होताच बदललेदेखील ! मात्र शहरातील गुन्हेगारीची एक्स्प्रेस थांबलीच नाही. शिर्डी विभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची 14 ऑक्टोंबर 2020 मध्ये भुसावळात बदली झाली. पदभार घेताच त्यांनी भुसावळातील गुन्हेगारी संपवण्याचा निर्धार केला. अनेक आव्हाने त्यांच्या डोळ्यापुढे होती, नागरीक बोलत नव्हते, व्यापारीही अंतर राखून होते तर गुन्हेगारीचा आलेख उंचावल्यानंतर डिटेक्शनही नावालाच असल्याने पोलीस दलाला कुणी चांगले म्हणेल, अशी स्थिती नव्हती.
पोलीस दलाचा वाढवला नावलौकीक
पोलीस दलाची नोकरी म्हणजे आव्हानांनी भरलेली त्यात भुसावळविषयी न सांगितलेलेच बरे अशी अवस्था असताना अनुभवाचा कस लावत नव्या दमाच्या या अधिकार्‍याने सुरूवातीला सर्वसामान्य भुसावळकरांशी नाळ जोडली.   शहरातील वाहतुकीचा असो वा अतिक्रमणाचा प्रश्न स्वतः पायी गस्त केली, अधिकारी रस्त्यावर उतरल्यानंतर दुय्यम अधिकार्‍यांसह कर्मचारीही रस्त्यावर उतरले. आधी नम्रपणे व्यापार्‍यांना सूचना करण्यात आल्या मात्र त्यानंतर पोलिसांनी कारवाईचा इंगाही दाखवला. कायद्यापेक्षा कुणीही मोठा नसल्याचा मेसेज त्यातून गेला.  पोलीस अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनाही नव्या दमाच्या अधिकार्‍याचा कामाचा हेवा वाटू लागल्याने मोठ्या प्रमाणावर डिटेक्शन वाढले तर गुन्हेगारीलादेखील आपसुक आळा बसू लागला. अभ्यासू अधिकार्‍याला लाभलेल्या दूरदृष्टीने नशिराबाद रेल्वे रूळाजवळ आढळलेले मृतदेह हे आत्महत्या नसून हत्याकांड असल्याचा दावा करीत प्रत्यक्षात त्यांनी एक-एक कडीत जोडत आरोपी गजाआड केले तर भुसावळातील हनुमान नगरात अकस्मात मृत्यूचा तपासादरम्यान हा खून असल्याचे सिद्ध करीत पोलीस दलाचा नावलौकीक वाढवला. जे खरं आहे तं खरेच आहे, खोटे करायचे नाही, विनाकारण कुणालाही अडवायचे नाही हे तत्व त्यांनी अखेरपर्यंत भुसावळात पाळले. एरव्ही पोलीस दलाविषयी बोटं मोडणारी, नाक मुरडणारी लोक आता पोलिसांचा गौरव करू लागली होती व त्याला कारणही पोलीस दलाकडून होणारी चांगली कृती हेच होते.
अनेक गुन्हेगार तुरूंगात फोडताय खडी
शांत बसतील ते भुसावळातील गुन्हेगार कसले ! चोर्‍या-घरफोड्यांसह अन्य अप्रिय घटनाही घडल्या मात्र खंबीर अधिकार्‍याने अ‍ॅक्शन प्लॅन तयार करीत रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले तर अनेकांवर एमपीडीएबाबत शिफारस करीत प्रस्ताव वरीष्ठांना सादर केले. तत्कालीन अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे व त्यानंतर आलेले पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनीदेखील गुन्हेगारांसह गुन्हेगारी टोळ्यांना हद्दपार केले तर जिल्हाधिकार्‍यांनीही सकारात्मक निर्णय घेत अनेकांवर एमडीएची कारवाई केल्याने गुन्हेगार पुरते हादरले. खाकीवर हात उचलणार्‍याला कायद्याचा धडा शिकवत त्याची धिंड काढण्यात आली तर राजाश्रय लाभलेल्या राजकारण्याच्या दिवट्यालाही ‘खाकी’ने अद्दल घडवल्याने कायद्यापुढे सर्व समान हा संदेश रूजला. पठाणी व्याजाने वसुली करणार्‍यांनी कोट्यवधींची माया जमवली खरी मात्र वाघचौरे यांनी याबाबतही कणखर भूमिका घेतली. अवैधरीत्या सावकारी करणार्‍यांना फैलावर घेत अनेक गुन्हे दाखल केले, अवैध मार्गाने जमवलेली संपत्ती शासनाकडे अटॅच करण्याबाबतही कणखर भूमिका घेतली. अवैध सावकाराच्या जाचाने पछाडलेल्या पीडीतांच्या तसेच महिलांच्या पाठीमागे खर्‍या अर्थाने कायद्याचा रक्षक असलेला वडिलासमान मोठा भाऊ उभा राहिल्याने त्यांचाही ऊर अभिमानाने दाटून आला.
जनसामान्यांचा म्हणून अधिकार्‍याचा अभिमान
‘शहाण्याने पोलीस ठाण्याची पायरी चढू नये’, असे गंमतीने म्हटले जाते मात्र पोलीस उपअधीक्षक वाघचौरे यांच्या कार्यकाळात तसे घडले नाही. एरव्ही पोलीस ठाण्यात तक्रारीचे गार्‍हाणे मांडणारे सर्वसामान्य असो वा व्यापारी आपल्या हक्काचा अधिकारी, न्याय निश्चित मिळणारच या विश्वासाने वाघचौरे यांची भेट घेवू लागला. वाघचौरे यांनीदेखील कधीही कोणत्याही नागरीकाला भेट टाळल्याचे ऐकिवात नाही. एरव्ही पोलीस उपअधीक्षकांच्या दालनात यापूर्वी मोबाईल बाहेर काढण्याची सूचना भुसावळात कर्मचारी करीत मात्र वाघचौरे यांनी चित्र बदलले. परवानगीशिवाय येवू नयेची सर्वात आधी पाटी हटवली, मोबाईल बाहेर काढून ठेवण्याचा प्रघातही मोडला त्यामुळे नागरीकांना भेटण्यापूर्वीचा संकोच कमी झाला, नागरीक खुलून बोलू लागले व त्यांच्या तक्रारींची योग्य दखल घेवून त्यांना कायद्याच्या मार्गाने न्याय देण्याची भूमिका घेतल्याने सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत वाघचौरे झाले.
निरोप देताना भुसावळकरही गहिवरले
मानवता सेवाधर्म हे एकच उद्दिष्ट मनाशी बाळगत निस्वार्थी सेवा बजावल्याने कोरोना काळात वाघचौरे यांचा राजपूत समाजाने कोविड योद्धा म्हणून गौरव केला तर अनेक सामाजिक संघटनांनीही अडीच वर्षात त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान केला. पोलीस दलाच्या बदल्यांना यंदा विलंब झाला. दोन वर्ष व सात महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर शासनाने केलेल्या बदल्यांमध्ये सोमनाथ वाघचौरे यांचेही नाव आल्यानंतर भुसावळकरांना मोठा धक्का बसला. शहराच्या इतिहासात प्रथमच सुमारे 35 वर संघटनांनी एकत्र येत वाघचौरे यांचा सत्कार केला. पाय ठेवायलाही जागा नव्हती इतकी गर्दी भुसावळकरांनी अधिकार्‍याला प्रेमाचा निरोप देताना केली, हे भुसावळच्या इतिहासात प्रथमच घडले. जळगावातही भुसावळच्या अधिकार्‍याचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेला गौरव चर्चेचा विषय ठरला. ‘असा अधिकारी होणे नाही’ म्हणत पाणावलेल्या डोळ्यांनी शहरवासीयांनी सोमनाथ वाघचौरे यांना निरोप दिला अर्थात् जळगाव जिल्ह्यात पुन्हा या मात्र यावेळी अपर अधीक्षक वा पोलीस अधीक्षक म्हणूनच !
मयूर अंजाळेकर, भुसावळ
जळगाव जिल्हा उपाध्यक्ष- महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना
मोबाईल- 95039-00740




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !