यावलमधील डॉक्टरांवर हल्ला : आरोपीला तीन वर्ष शिक्षा
यावल : शहरातील डॉक्टरांवर हल्ला करीत त्यांच्याकडील रक्कम लुटल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीस यावल न्यायालयाने मंगळवार, 21 रोजी तीन वर्षांची शिक्षा सुनावली. आरीफ रशीद खाटीक असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.
डॉक्टरांवर हल्ला करीत लांबवली होती रक्कम
15 जून 2018 रोजी आरोपी आरीफने शहरातील अलफैज क्लिनीकचे डॉ.रीजवान अहमद यांच्याकडे पाच हजारांची मागणी केली होती तर पैसे न दिल्याने डॉक्टरांच्या हातावर चाकू मारत त्यांच्या गळ्यातील स्टेथोस्कोप टेबलावर आपटून ड्रावरमधील तीन हजारांची रोकड घेवून पोबारा केला होता. यावेळी कम्पांऊडरलाही धक्काबुक्की करण्यात आली होती. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर यावल न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारी वकील अॅड.नितीन खरे यांनी 12 साक्षीदारांचे जवाब नोंदवले. तपास सहाय्यक निरीक्षक योगेश तांदळे यांनी केला. न्या.डी.जी.जगताप यांच्या न्यायासनापुढे खटल्याचे कामकाज चालले. आरोपीविरुद्ध भादंवि 394, 427 व 506 अन्वये दोषी मानले गेले. भादंवि 394 अन्वये तीन वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवस कैद, 427 अन्वये एक वर्ष सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 15 दिवस कैद तसेच 506 अन्वये एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 15 दिवस कैदेची शिक्षा सुनावण्यात आली.



आरोपीला दुसर्यांदा सुनावली शिक्षा
आरोपी रशीद खाटीक यास गतवर्षी 17 जानेवारी 2019 यावल न्यायालयाने चोरीच्या गुन्ह्यात दोन वर्ष शिक्षा व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. हा खटलादेखील न्या.जगताप यांच्या न्यायासनासमोर चालला व सरकारतर्फे अॅड.नितीन खरे यांनीच त्यावेळी युक्तीवाद केला, हेदेखील विशेष!
