भुसावळात विविध मागण्यांसाठी पेन्शनर्स असोसिएशनचा सोमवारी पालिकेवर मोर्चा
भुसावळ : सहाव्या वेतन आयोगाचा फरक मिळावा, पेन्शन विक्रीसह सेवानिवृत्तीचे अन्य लाभ मिळण्यासह अन्य न्याय मागण्यांसाठी भुसावळ पेंन्शनर्स असोसिएशनतर्फे सोमवार, 27 रोजी भुसावळ पालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे सातवा वेतन आयोग, वेतन निश्चिती व सेवानिवृत्ती वेतन निश्चिती करण्यात आलेली आहे. त्याच आदेशात सेवानिवृत्त कर्मचार्यांना सातव्या वेतन आयोग आणि फरक रोखीने देण्याबाबतचे आदेश असतानाही अद्याप फरक दिलेला नाही. हा फरक त्वरीत मिळावा, पीपीओ ऑर्डर देण्यात यावी, भुसावळ शहराचा विस्तार पाहता 100 नागरिकांवर पाच सफाई कर्मचारी लोकसंख्येच्या आधारावर नियुक्त करावे, लाड- पागे समितीने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी, सातव्या वेतन आयोगाप्रमाणे आश्वासीत प्रगती योजना 10, 20 व 30 प्रमाणे कर्मचार्यांना लाभ देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी भुसावळ म्युनिसिपल पेंन्शनर्स असोसिएशनने पाठपुरावा केला मात्र प्रशासनाकडून कोणत्याही मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवली जात नाही. यामुळे आता पेंन्शनर्स असोसिएशनने यापूर्वी दिलेल्या इशार्याप्रमाणे सोमवारी मोर्चा काढण्यात येणार आहे.
अन्यथा सीओंच्या घरी मोर्चा नेणार
मोर्चाच्या दिवशी मुख्याधिकारी करुणा डहाळे यांना नगरपालिका कार्यालयात उपस्थित राहण्याबाबतचे आदेश प्रांताधिकारी व जिल्हाधिकार्यांनी द्यावेत. मुख्याधिकारी डहाळे या कार्यालयात उपस्थित न राहिल्यास पेन्शनर्स असोसिएशचा मोर्चा त्यांच्या निवासस्थानापर्यंत काढला जाईल, असा इशाराही भुसावळ म्युनिसीपल पेन्शनर्स असोसिएशने प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी व प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी 10 वाजता गांधी पुतळ्यापासून मोर्चाला सुरूवात होईल. गांधी पुतळा, जळगावरोडवरील तहसील कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालयमार्गे मोर्चा पालिका कार्यालयात जाईल. मोर्चाचे नेतृत्व पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एस. एल. पाटील करतील. यावेळी शहरातील सर्व सदस्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.



