भुसावळ रेल्वे स्थानकासह गाड्यांमधील अवैध विक्रेते हटवणार
रेल्वे सुरक्षा बलाचे वरीष्ठ आयुक्त क्षितीज गुरव यांची माहिती
भुसावळ : रेल्वे स्थानकावर येणार्या प्रवाशांच्या बॅगा, लगेज यांची तपासणी सक्त केली जाणार असून प्रवासी सुरक्षेला अधिक प्राधान्य देण्यात येणार असून भुसावळ रेल्वे स्थानकावरील अनधिकृत विके्रते हटवले जातील, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे नवनियुक्त वरीष्ठ आयुक्त क्षितीज गुरव यांनी दिली. रेल्वे सुरक्षा बलाचे वरीष्ठ आयुक्त अजय दुबे यांची रायबरेली येथे बदली झाल्याने त्यांनी गुरूवारी नवीन वरिष्ठ आयुक्त क्षितीज गुरव यांच्याकडे पदभार सोपविला.
प्रवासी सुरक्षेला अधिक प्राधान्य
गुरव म्हणाले की, रेल्वे स्थानक आणि धावत्या गाड्यामध्ये अवैध खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्याला अधिक प्राधान्य दिले जाणार असून विभागात लांब पल्यांच्या गाड्यांची होणारी चेन पुलिंग करणार्यावर बारीक लक्ष राहणार आहे. चेन पुलिंग होऊ नये यासाठी जनजागृती केली जाईल, आरपीएफ हेल्पलाईन क्रमांकाबाबत सुध्दा प्रवाशांमध्ये जागृती केली जाईल. पुणे सायबर सेलचा आधार घेऊन ब्लॅकने तिकीटे विकणार्यांवर कारवाई होईल शिवाय गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न राहणार असल्याचे गुरव म्हणाले.

