फैजपूरात 27 पासून 27 कुंडी महाविष्णूयाग महोत्सव
कारगील युध्दाचे हिरो मेजर दीपचंद नाईक यांची विशेष उपस्थिती : 3 फेब्रुवारी महोत्सवाचा होणार समारोप
फैजपूर : 27 कुंडी महाविष्णूयाग महोत्सव गाथा पारायण व नामसंकीर्तन सप्ताहाला खंडोबा वाडी देवस्थानात सोमवार, 27 जानेवारीला सुरूवात होत आहे तर 3 फेब्रुवारीला समाप्ती होणार आहे. यावेळी कारगील युध्दाचे हिरो मेजर दीपचंद नाईक यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. हभप प्रसाद महाराज, अमळनेर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत 27 कुंडी महाविष्णूयाग, हभप चैतन्य महाराज, देगलुरकर यांच्या अमृतवाणीद्वारे ‘योगी पावन मनाचा’ या विषयावर प्रवचन महोत्सव व गाथा पारायण नामसंकीर्तन सप्ताह होत आहे.
विविध धार्मिक कार्यक्रम होणार
दैनिक कार्यक्रमात पहाटे 5 ते 6 काकडा आरती, सकाळी 6 ते 7 विष्णू सहस्त्रनाम, सकाळी 8 ते 11 गाथा पारायण, संध्याकाळी 5 ते 6 हरीपाठ होईल. 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दुपारी 3 ते 5 योगी पावन मनाचा, मुक्ताई चिंतन (वाटीचे अभंग) या विषयावर हभप चैतन्य महाराज देगलूरकर यांचे प्रवचन होईल. यज्ञ महोत्सव पूजा 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दररोज सकाळी 8 ते 1, यज्ञ आचार्य वेदमूर्ती वेदभूषण पूज्य हेमंत लक्ष्मण धर्माधिकारी महाराज, नाशिक व ब्रम्हवृंद फैजपूर तर गाथा पारायण 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दररोज सकाळी 8 ते 12 दरम्यान होईल.
रात्री 8 ते 10 दरम्यान कीर्तन
सोमवार, 27 रोजी भरत महाराज पाटील, बेळीकर, मंगळवार, 28 रोजी माधव महाराज राठी, नाशिक, बुधवार, 29 रोजी संदीपान महाराज शिंदे आळंदी, गुरूवार, 30 रोजी आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज, जोशी बाबा बीड, शुक्रवार, 31 रोजी पांडुरंग महाराज घुले, श्रीकेश्त्र देहू, शनिवार, 1 फेब्रुवारी रोजी जयवंत महाराज बोधले, पंढरपूर, रविवार, 2 रोजी चैतन्य महाराज देगलुरकर, सोमवार, 3 रोजी चंद्रशेखर महाराज देगूलकर यांचे कीर्तन होईल. दरम्यान, रविवार, 26 जानेवारी रोजी दुपारी 3 ते 6 खंडोबा वाडी मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात होईल तर गुरुवार, 30 रोजी रक्तदान शिबिर, रांगोळी व चित्रकला स्पर्धा होईल.
कारगील मेजरांची विशेष उपस्थिती
कारगील युध्दांचे हिरो मेजर दीपचंद नाईक यांनी 1999 च्या कारगील युध्दामध्ये त्यांनी आपले दोघी पाय व उजवा हात देशासाठी गमवावा लागला होता. 1889 मिसाईल रेजीमेंट गाव-पावडा हरीयाणा येथील रहीवासी,मेजर दीपचंद नाईक यांनी व त्यांचे मित्र सैनिकांनी मिळुन टोलोलींगची लढाई यशस्वीपणे जिंकली होती. गुरुवार, 30 जानेवारी रोजी दुपारी दोन श्रीमद् भागवद कथा ज्ञानयज्ञ समिती, फैजपूर तसेच यावल-रावेर तालुका वारकरी भाविक भक्तांतर्फे सन्मानीत करण्यात येणार आह. प्रसंगी चित्रकला व रांगोळी स्पर्धेच्या विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. दरम्यान, धार्मिक कार्यक्रमास उपस्थिती द्यावी, असे आवाहन श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ समितीसह वारकरी भाविक भक्त व ग्रामस्थ मंडळी, नरेंद्र नारखेडे, अनिल नारखेडे, विजय परदेशी, सुरेश परदेशी, सी.के.चौधरी, पंडित कोल्हे, गणेश पाटील आदींनी केले आहे.

