रावेर लोकसभा मतदारसंघात डॉ.केतकी पाटील यांची साखरपेरणी : आगामी निवडणुकीच्या प्रबळ दावे दार !
Dr. Ketki Patil’s engagement in Raver Lok Sabha Constituency : Strong claims for upcoming elections ! रावेर : रावेर लोकसभा निवडणुकीला अद्याप वर्षभराचा अवधी शिल्लक असलातरी आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आतापासून व्यूहरचना तयार केली आहे. काँग्रेसचे माजी खासदार, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या डॉ.उल्हास पाटील यांची कन्या असलेल्या डॉ.केतकी पाटील या रावेर लोकसभेच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. सध्या त्यांनी रावेर लोकसभा मतदारसंघात भेटीगाठी सुरू केल्या असून स्वबळावरच त्या आपले कर्तृत्व निर्माण करीत असल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. बुधवार, 9 ऑगस्ट रोजी डॉ.केतकी यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्यावर सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला शिवाय या दृष्टीने त्यांनी मतदारसंघात साखरपेरणीदेखील केली आहे.
मतदारसंघात करताय साखर पेरणी
डॉ.केतकी पाटील रावेर लोकसभा मतदार संघातील इच्छूक उमेदवारांपैकी एक मानल्या जातात. लोकसभा 2024 च्या दृष्टीने त्यांनी मतदार संघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. आधी राजकारणात फारशा सक्रिय नसणार्या डॉ.केतकी पाटील गत काही महिन्यांपासून कमालीच्या सक्रिय झाल्या आहेत. गावागावांमध्ये संपर्कावर त्यांनी भर दिला आहे. त्यांच्या या गाठीभेटींमुळे त्या रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित आहे. असे असले तरी त्या कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. कारण त्यांनी आतापर्यंत काँग्रेससह कोणत्याही पक्षाचे लेबल लावलेले नाही मात्र त्या काँग्रेसच्या प्रबळ दावेदार असू शकतात, असादेखील मतप्रवाह आहे.

तूल्यबळ उमेदवार
सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी पाहता लोकसभा निवडणुकीपर्यंत कोणती व कशी राजकीय समीकरणे राहतात, याचा अंदाज लावणे थोडेसे कठीण आहे. डॉ.केतकी पाटील देखील आतापासून ठराविक पक्ष किंवा विचारसरणीत अडकण्यापेक्षा ‘प्रॅक्टिकल’ राजकारणाच्या वाटेवर जातील, अशी शक्यता जास्त आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील लेवा समाजाचे प्राबल्य, उच्च शिक्षित व महिला उमेदवार हे त्यांच्या जमेच्या बाजू असल्याने त्यांच्याकडे तुल्यबळ उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. यामुळे डॉ.केतकी पाटील यांनीही कोणत्याही पक्षाचे लेबल न लावून घेता स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्यावर भर दिला आहे. येणार्या निवडणुकीत डॉ. केतकी पाटील वडिलांप्रमाणेच काँग्रेस पक्षाचा वारसा चालवतील की, आपली वेगळी वाट शोधतील, याचे उत्तर आगामी काळात मिळणार आहे मात्र स्वकर्तृत्वावर स्वत:ची स्वतंत्र वाट निवडणार्या डॉ.केतकी पाटील यांना मतदारांकडून विशेष प्रतिसादही लाभत असल्याने त्यांचा हुरूप वाढला आहे.
लेवा समाजाची मोठी ताकद
रावेर मतदारसंघात मराठा समाजाचे मताधीक्य साडेतीन लाखांवर असलेतरी मात्र या ठिकाणी दोन लाखात मताधिक्य असलेल्या लेवा समाजाचाच खासदार निवडून येत असतो. रावेर मतदारसंघात लेवा पाटीदार समाजाचे सुमारे दोन लाख पाच हजार मतदार आहेत. आतापर्यंतचा इतिहास पाहता या मतदारसंघातून लेवा पाटीदार समाजाला संधी मिळाली आहे.
एका सर्व्हेनुसार, रावेर मतदारसंघात मराठा समाज तीन लाख 70 हजार तर दोन लाख पाच हजारांवर लेवा समाजाचे मतदार आहेत. मुस्लिम समाजाचे दोन लाख, बौद्ध समाजाचे दोन लाख 10 हजार, गुर्जर समाजाचे 78 हजार, माळी 85 हजार, कोळी 1 लाख 12 हजार, पावरा आणि पारधी 21 हजार, धनगर 43 हजार, बंजारा 70 हजार, तडवी 44 हजार, राजपूत 42 हजार, तेली 38 हजार, राजस्थानी 80 हजार अशी समाजनिहाय मते आहेत.
