बँकेत ग्राहक जाताच चोरट्यांनी दुचाकीच्या डिक्कीतून अडीच लाख लांबवले : एरंडोल शहरातील भरदिवसाच्या घटनेने खळबळ
Thieves withdrew Rs 2.5 lakh from HDF Bank in Erandol city एरंडोल : शहरातील धरणगाव चौफुलीसमोर एचडीएफसी बँकेसमोर लावलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्याने तब्बल अडीच लाखांची रोकड लांबवल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. ही धक्कादायक घटना बुधवारी 2.55 ते 3 वाजेदरम्यान घडली. सीसीटीव्ही चोरटा कैद झाला असून याप्रकरणी अज्ञाताविरोधात एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अशी आहे नेमकी घटना
सम्यक इंग्लिश मेडियम स्कूलचे बांधकाम सुरू असल्याने शाळेच्या प्राचार्या निता पाटील यांनी शाळेतील शिक्षक उज्वलसिंग विजयसिंग पाटील (खडके खुर्द) यांना धनादेश दिल्यानंतर त्यांनी बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास स्टेट बँकेतून तीन लाख रुपये काढून दुचाकीच्या डिक्कीत ठेवले. त्यानंतर उज्वलसिंग पाटील हे दुचाकी (क्रमांक एम.एच.19 बी.व्ही.5288) ने राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या दत्त कॉलनीत असलेल्या एच.डी.एफ.सी.बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असता बँकेबाहेरच दुचाकी त्यांनी पार्क केली असता चोरट्यांनी पाटील हे बँकेत जाताच दुचाकीच्या डिक्कीतून अडीच लाख लांबवले. काही वेळात पाटील हे बँकेबाहेर येताच त्यांना घडलेला प्रकार लक्षात आला. बँकेतील सीसीटीव्ही पाहिल्यानंतर एक संशयित वाहनाभोवती फिरत असल्याचे स्पष्ट झाले.








