पारोळा तालुक्यात अल्पवयीन बालिकेवर अत्याचारानंतर ठार मारण्याचा प्रयत्न : नराधमाला अटक
Attempt to kill a minor girl in Parola taluk after torture : Murderer arrested पारोळा : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल व भडगाव तालुक्यात अत्याचाराची घटना विस्मरणात जात नाही तोच पारोळा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केल्यानंतर तिला ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याने समाजमन संतप्त झाले आहे. पीडित अल्पवयीन मुलीला धुळे शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. संतप्त जमावाने आरोपीवर कारवाईच्या मागणीसाठी रास्ता रोको करीत पारोळा पोलीस ठाण्यात धडक दिली.
आरोपीच्या अटकेनंतर जमाव शांत
संतप्त ग्रामस्थांनी पारोळा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत आरोपीला तत्काळ फाशी देण्याची मागणी केली. पोलिसांकडून ग्रामस्थांची समजूत काढून आरोपीला अटक केली. पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी समजूत काढल्यानंतर जमाव शांत झाला. पारोळा तालुक्यात एका गावात 10 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या 14 वर्षीय मुलीवर गावातील बारक्या उर्फ अशोक मंगा भील (19) याने लैंगिक अत्याचार केला. त्याला विरोध केला असता त्याने मुलीच्या डोक्यावर दगड मारून व दोरीने गळा आवळून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.






पीडीतेने कशीबशी केली सुटका
याबाबत काही वेळानंतर जखमी अवस्थेत मुलगी घरी गेल्यानंतर घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीला धुळे शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या अमानवीय घटनेच्या अनुषंगाने आ. चिमणराव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन, दोषीवर तत्काळ कार्यवाही करून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. या वेळी आ. चिमणराव पाटील यांनी घटनास्थळी उपस्थित उपविभागीय पोलीस अधीक्षक सुनील नंदवाळकर व पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना सूचना दिल्या. तर बालिकेच्या आईची त्यांच्या घरी जाऊन भेट घेत नियमानुसार सर्वोतोपरी सहकार्य करु, असे आश्वासन दिले.
पीडीतेला न्याय देण्याची मागणी
वरीष्ठाशी संपर्क करुन गुन्हेगारावर कठोर कारवाई करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी या वेळी केली. या वेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करुण पीडित मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी केली. तसेच पीडित मुलीच्या आईची भेट घेवून या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासित केले.


