भुसावळात हद्दपार आरोपीला पेट्रोलने जाळण्याचा प्रयत्न
भुसावळ शहरातील खळबळजनक घटना : भाजपा नगरसेवकाच्या भावासह 12 जणांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा
भुसावळ : पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याच्या वादातून शहरातील हद्दपार आरोपी प्रशांत उर्फ मुन्ना संजय चौधरी (रा.भुसावळ) याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी अडीच वाजता घडली होती. या प्रकरणी मुन्ना चौधरी यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार भाजपा नगरसेवक किरण कोलते यांचे बंधू तथा सीआरएमएस पीओएच शाखेचे अध्यक्ष किशोर कोलते यांच्यासह 12 जणांविरुद्ध प्राणघातक हल्ला, दंगल यासह विविध कलमान्वये शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्यासह लोखंडी रॉड व लाकडी दांड्याने मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
प्राणघातक हल्ल्याला पोलिसात तक्रार दाखल केल्याचे निमित्त
भाजपाचे नगरसेवक किरण कोलते यांना गुरुवारी रात्री विनाकारण शिवीगाळ करीत त्यांच्या खिशातील रोकड बळजबरीने हिसकावून नेल्याप्रकरणी आरोपी संजय लोटन चौधरी व प्रशांत उर्फ मुन्ना संजय चौधरी (रा.भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता तर संजय चौधरी यांनीही नगरसेवक किरण कोलते यांच्यासह सहा जणांविरुद्ध शिवीगाळ तसेच दुचाकीचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 24 तासात शुक्रवारी दुपारी संशयीत आरोपी मुन्ना चौधरीवर हल्ला झाला होता. वडिलांनी आरोपींविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून आरोपींनी हल्ला केल्याचे चौधरी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.



बहिणीकडे जाताना आरोपींनी चढवला हल्ला
मुन्ना चौधरी यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी दुपारी अडीच वाजता ते आपल्या वरणगावातील बहिणीला भेटण्यासाठी निघाले असताना राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल सुहासजवळ दुचाकीवरून जात असताना संशयीत आरोपी तीन दुचाकीवर आले व त्यांनी दुचाकी अडवल्याने आपण प्राण वाचवण्यासाठी रस्ता ओलांडून ट्रकला लटकलो मात्र आरोपींनी आपल्याला ओढत मारहाणसुरू केली तर कल्पेश ढाके याने सोबत आणलेले पेट्रोल अंगावर टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला तर नितीन नंदवणे याने लोखंडी रॉडने डोक्यावर हल्ला चढवला तर किशोर कोलतेने अश्लील शिविगाळ करीत याला जिवंत सोडू नका म्हणत लाकडी दांड्याने मारहाण सुरू केली तर मयूर कोलते याने सोबतच्या डाव्या करंगळीवर व दंडावर हल्ला केला तसेच अन्य आरोपींनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण करीत पळ काढला. या हल्ल्यानंतर मित्र ललित ढोले व हर्षल परदेशी यांनी जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या आरोपींविरुद्ध दाखल झाला गुन्हा
चौधरी यांच्या फिर्यादीनुसार, सीआरएमएस पीओएच शाखेचे अध्यक्ष किशोर कोलते यांच्यासह किशोर पाटील, नितीन नंदवणे, गोलू वारके, कल्पेश ढाके, मयूर कोलते, रगड्याचा गाडीवाला व अन्य पाच ते सात अनोळखींविरुद्ध भादंवि 307, 326, 341, 143, 148, 149 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत करीत आहेत.
