अपहार भोवला : दोन संस्थांध्यक्षासह चौघा तत्कालीन प्रकल्पाधिकार्यांविरुद्ध गुन्हा
यावल आदिवासी प्रकल्प कार्यालय ठरतेय भ्रष्टाचार्यांसाठी कुरण : तब्बल 20 लाखांचा अपहार चौकशीत उघड
यावल- यावल एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय भ्रष्टाचारी अधिकार्यांसाठी कुरण ठरत असता अपहाराचे विविध गुन्हे उघड होत असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. दोन संस्थाध्यक्षांच्या मदतीने तत्कालीन प्रकल्प अधिकार्यांसह सहा जणांनी 20 लाख 42 हजारांचा 2004 ते 2009 या काळात अपहार केल्याप्रकरणी रविवारी यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सन 2004 ते 2009 दरम्यान यावल एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयामध्ये तत्कालीन प्रकल्प अधिकारी म्हणून एस.टी.भालेराव, टी.बी. पाडवी, एन.एम. निकुंभे, जी.एन. वळवी, जळगाव येथील अन्नदाता कृषी संशोधन संस्थेचे अध्यक्ष, सेक्रेटरी व व्हिलेज केमिकल्स सोसायटीच्या अध्यक्षांसोबत अधिकार्यांनी सन 2004 ते 2009 दरम्यान संगनमत करून अनुसूचित जमातीच्या शेतकर्यांसाठी लघू उपसा जलसिंचन योजना कामात तब्बल 20 लाख 42 हजार रुपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक करीत आर्थिक नुकसान करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
न्या.गायकवाड चौकशी समितीने उघडकीस आणला भ्रष्टाचार
आदिवासी विभागामध्ये भ्रष्टाचार, अपहार झाल्यामुळे न्या. गायकवाड यांच्या समितीला चौकशीचे आदेश दिले होते. तेव्हा गायकवाड चौकशीच्या अहवालातून सदर अपहार झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे सदरील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पीव्हीसी पाईप अपहाराचाही गुन्हा
प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सन 2004 ते 2009 दरम्यान तत्कालीन प्रकल्प अधिकारी एस.टी. भालेराव यांनी शासन निर्णय 2001 मधील कार्यप्रणालीचा भंग करून शासन निर्णयाप्रमाणे लाभार्थी लोकांना पीव्हीसी पाइप वाटप न करता बेकायदेशीर मार्गाने पीव्हीसी पाईपांची विल्हेवाट लावून पाच लाख 21 हजार 991 रकमेचा अपहार करून शासनाची फसवणूक करीत आर्थिक नुकसान केले म्हणून त्यांच्या विरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, हवालदार संजय तायडे करीत आहे.

