कंडारी गावातील तिघा तरुणांचे हत्याकांड : आणखी एका आरोपीला अटक ; आरोपीचे घर पेटवण्याचा प्रयत्न असफल
Kandari village murder of three youths: One more accused arrested; An attempt to set fire to the house of the accused failed भुसावळ : भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावंडांची निर्घृण हत्या करण्यात आली होती तर उपचारादरम्यान अन्य एका तरुणाचाही मृत्यू झाल्याने मृतांची संख्या तीन झाली होती. दरम्यान, हत्याकांडानंतर संतप्त जमावाने आरोपी दीपक तायडे याचे घर पेट्रोल टाकून पेटव्ण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने यात यश आले नाही. दरम्यान, हत्याकांडातील जखमी रमेश अमोल इंगळे (32, सर्व रा.कंडारी) या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर रविवारी त्याच्यावर शोकाकुल वातावरणात बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. हत्याकांडप्रकरणात देवा भील या संशयिताला रविवारी अटक करण्यात आली असून यापूर्वी अटकेतील तिघांना न्यायालयाने 7 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जुन्या वादातून भावंडांची हत्या : तिघांना अटक
भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातील शांताराम भोलानाथ साळुंखे (33) व राकेश भोलानाथ साळुंखे (28) या वीटभट्टी कामगार भावंडांची जुन्या वादातून दहा संशयितांनी चाकू, तलवार व लोखंडी रॉड डोक्यात मारून निर्घृण हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास कंडारी गावातील महादेव टेकडी परीसरातील पूजा पान सेंटरजवळील वखारीजवळील चौकात घडली होती. या घटनेत या रमेश अमोल इंगळे (32, सर्व रा.कंडारी) हे व विकी साळुंखे (30) हे जखमी झाल्यानंतर अत्यवस्थ मेश इंगळे यांचा उपचार सुरू असताना गोदावरी रुग्णालयात रविवारी पहाटे दोन वाजता मृत्यू झाला. रविवारी सकाळी मृतदेहावर ट्रामा सेंटरमध्ये डॉ.मयूर चौधरी यांनी शवविच्छेदन केल्यानंतर दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अटकेतील तिघांना चार दिवसांची कोठडी
कंडारीतील खून प्रकरणी दीपक छगन तायडे व मनोज श्रावण मोरे व किरण सपकाळे (तिन्ही रा.कंडारी, ता.भुसावळ)) या तीन संशयितांना अटक करण्यात आली असून रविवारी त्यांना भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची अर्थात 7 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या हत्याकांडप्रकरणी देवा भील या संशयिताला रविवारी तापी नदीपात्राजवळून अटक करण्यात आली आहे.
हत्याकांडातील आरोपीचे घर पेटवण्याचा प्रयत्न
कंडारी हत्याकांडातील आरोपी दीपक तायडे याचे घर जाळण्याचा प्रयत्न अज्ञातांनी शनिवारी सायंकाळी केला मात्र पेट्रोलची फेकलेली बाटली वेळीच पोलिसांनी ताब्यात घेतली तर बाटली फेकणारे संशयीत मात्र कारमधून पसार झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
