साखरपुड्याला जाणार्‍या दाम्पत्याचे सव्वातीन लाखांचे दागिने लंपास


जळगाव-मेहकर बसमधील घटना : चोरीनंतर संशयीत भुसावळात उतरला

भुसावळ : साखरपुड्याला जाणार्‍या दाम्पत्याच्या बॅगेतील नवरीसाठी असलेले तब्बल सव्वातीन लाखांचे दागिने चोरट्याने बसमधून लांबवण्याची घटना भुसावळात 23 घडली तर या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजसच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

पाळत ठेवून चोरीचा संशय
जळगावच्या शिरसोली बु.॥ येथील तक्रारदार यशवंत मनोहर जोशी हे पत्नी व दोन मुलांसह राहतात. 25 रोजी त्यांचा शालक विनोद वसंतराव देशपांडे याचा सोनाटी, ता.मेहकर, जि.बुलढाणा येथे साखरपुडा असल्याने साखरपुड्यासाठी जळगावातून दोन सोन्याच्या नथ, सोन्याचा लांब हार, पायातील साखळ्या घेतल्या होत्या. 23 जानेवारी रोजी हे दाम्पत्य शिरसोली येथून जळगाव स्थानकावर आले व तेथून जळगाव-पुसद बसने सोनाटी गावाकडे जाण्यासाठी निघाले. सोन्याचे दागिने असलेली पर्स मोठ्या काळ्या बॅगेत कपड्यांखाली ठेवण्यात आली होती व बॅग एसटीच्या रॅकवर ठेवण्यात आली होती मात्र सीटमागे बसलेल्या इसमाने बॅग खाली पडत असल्याचे सांगून पायाजवळ बॅग ठेवली व भुसावळ आल्यानंतर हा इसम खाली उतरला. दरम्यान, मेहकर येथे उतरल्यानंतर हे दाम्पत्य कारने सोनाटी येथे गेले व बॅगमधील कपडे काढताना त्यात दागिने असलेली पर्स नसल्याचे लक्षात आल्यानंतर जळगाव-भुसावळ दरम्यानच संशयीताने चोरी केल्याची दाम्पत्याची खात्री झाल्याने त्यांनी मंगळवारी बाजारपेठ पोलिसात तक्रार नोंदवली.

सव्वा तीन लाखांचा लंपास
यशवंत जोशी यांच्या तक्रारीनुसार, 4 हजार 800 रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या नथ, दोन हजार 400 रुपये किंमतीची एक सोन्याची नथ, 32 हजार 450 रुपये किंमतीच्या पायातील चांदीच्या साखळ्या, साडेचार तोळे वजनाचा व एक लाख 59 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा हार, दोन तोळे वजनाचा व 54 हजार रुपये किंमतीचा नेकलेस, 60 हजार रुपये किंमतीचा दोन तोळे वजनाचा पोहे हार, 30 हजार रुपये किंमतीच्या पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या असा एकूण तीन लाख 12 हजार 650 रुपये किंमतीचा ऐवज चोरीला गेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !