भुसावळात बंदला हिंसक वळण : पोलिस निरीक्षकांसह पाच जण जखमी
शहरात तणावपूर्ण शांतता : संवेदनशील भागात वाढीव बंदोबस्त
भुसावळ : भारत बंदला शहरात अचानक हिंसक वळण मिळाल्यानंतर संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिस निरीक्षकांसह तीन कर्मचारी व
एक छायाचित्रकार जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी 11.30 वाजता शहरात घडली. या घटनेप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी शहराला भेट देत नागरीकांना शांतता राखण्याचे आवाहन केले तसेच दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचे सुतोवाच केले.
पोलिसांचा दबाव झुगारून जमावाची दगडफेक
बुधवारी सकाळी सुरवातीस बाजारपेठ खुली असल्याने शनिमंदीर वार्डाकडून दुकाने बंद करण्यासाठी जमाव येत असतानाच काझी प्लॉटजवळ पोलिसांनी जमाव अडवून तो पांगवला मात्र रजा टॉवरमार्गे काही जमाव पुन्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील हॉटेल आर्य निवाससमोर जमल्यानंतर काहींनी दुचाकी फेकल्या तर काहींनी हॉटेलवर दगड भिरकावल्याने दुकानाची तावदाने फुटली. यानंतर डीवायएसपी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व तालुक्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी जमावाला पांगविले.



पोलिस निरीक्षकांसह पाच जण जखमी
हिंसक जमावाने काझी प्लॉट परीसरात केलेल्या दगडफेकीत बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्यासह डीबीतील कर्मचारी कृष्णा देशमुख, नंदकिशोर सोनवणे, संजय भदाणे हे चौघे जखमी झाले तसेच दैनिक दिव्यमराठीचे छायाचित्रकार कमलेश चौधरी यांच्या डोक्याला दगड लागल्याने तेदेखील जखमी झाले. कृष्णा देशमुख यांना अधिक मार लागल्याने त्यांना शहरातील डॉ.निलेश महाजन यांच्या दवाखान्यात हलवण्यात आले आहे.
खडका चौफुलीवर बॅरीगेटस लावून रस्ता रोकोचा प्रयत्न
पांगलेला जमाव पुन्हा खडका चौफुलीवर पोहोचला व महामार्गासाठी असलेले बॅरीगेटस लावून महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्याचवेळी पोलिसांनी धाव हा प्रयत्न हाणून पाडला. खडका चौफुलीवर दुपारी एका वाजेच्या सुमारास जमाव पुुन्हा जमा झाला. यावेळी बामसेफ संघटनेचे कार्यकर्ते प्रतिभा उबाळे, एम.एम.मन्सुरे, हमीद शेख आदींनी जमावाला मार्गदर्शन केले. जोपर्यंत कायदा रद्द करण्यात येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल तसेच मैदानावरची लढाई लढतच रहा, असे आवाहन करण्यात आले.
दोषींवर कठोर कारवाई -पोलिस अधीक्षक
भुसावळ घडलेली घटना निश्चित अप्रिय असून पोलिसांकडून आता दोषींवर निश्चितच कठोर कारवाई केली जाईल, आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकार्यांना केल्या असल्याचे पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले म्हणाले. याप्रसंगी त्यांनी जमावाने केलेल्या घटनास्थळाची पाहणी करून अधिकार्यांशी चर्चा केली.

