फैजपूरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद : व्यापार्यांनी दुकाने ठेवली बंद
फैजपूर : राष्ट्रीय नागरीकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरीक नोंदणीच्या विरोधात सर्व पक्षीयांच्या वतीने पुकारलेल्या भारत बंदला फैजपूर शहरात बुधवार उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. फैजपूर शहरातील छोट्या-मोठ्या व्यावसायीकांनी आपली दुकाने बंद ठेवून भारत बंदमध्ये सहभाग घेतला. शाळा, रुग्णालये, औषध दुकाने, बँका आदी अत्यावश्यक सेवा वगळता फैजपूर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आल्याने व्यवहार ठप्प झाले होते.
छोट्या-मोठ्या व्यासायीकांचाही बंदमध्ये सहभाग
सर्व पक्षीयांच्या वतीने बुधवारी पुकारलेल्या भारत बंदला फैजपूर येथील व्यापारी व शहरातील नागरीकांनी मोठा प्रतिसाद दिला. फैजपूर शहरातील छोट्या-मोठ्या व्यावसायीकांनी सकाळपासूनच आपापली दुकाने बंद ठेवली होती. यामध्ये सुभाष चौक, कै.बळीराम वाघुळदे कॉम्प्लेक्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बाजार पेठ, सरदार वल्लभभाई पटेल कॉम्प्लेक्स तसेच मुख्य शहरातील व्यापार्यांनी आपली दुकाने बंद ठेवून भारत बंद मध्ये सहभाग घेतला. केंद्र सरकारने सीएए आणि एनआरसी हा कायदा घटनेविरूध्द लागू केला आहे. या कायद्यामुळे मुस्लिम समाजच नाही तर हिंदु समाजातील मोठा घटक व बहुजन समाज बाधीत होणार आहे. त्यामुळे या कायद्याच्या विरोधात लोकशाहीच्या मार्गाने शांततेत बंद पाळण्याचे आवाहन सर्व पक्षीयांच्या वतीने करण्यात आले. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, फैजपूर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त राखला आहे.

