सातारा मॅरेथॉनमध्ये भुसावळच्या धावपटूंचा डंका
Runners from Bhusawal in Satara Marathon भुसावळ : जगप्रसिद्ध सातारा हिल हाफ मॅरेथॉन नुकतीच सातार्यातील येवतेश्वर डोंगरमाथ्यावर झाली. त्यात भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनच्या उमेश घुले, तरुण बिरीया, संजय भदाने, कौस्तुभ मंत्री, प्रियंका मंत्री, प्रदीप सोलंकी, अजय आंबेकर, गणसिंग पाटील, प्रवीण पाटील या धावपटूंनी 21 किमी धावून यशस्वी सहभाग नोंदविला. समुद्रसपाटीपासून 1100 मीटर उंचीवर डोंगराच्या रस्त्याने धावत जाऊन ही स्पर्धा पूर्ण करणे प्रत्येक धावपटूसाठी आव्हान होते. यावर्षी 7500 हून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. त्यापैकी केवळ पाच 985 धावपटू सदरची अवघड स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करू शकले.
पोलीस परेड ग्राउंडपासून पहाटे 6.30 वाजता या स्पर्धेस सुरुवात झाली. खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस महासंचालक आदी अधिकार्यांसमवेत स्पर्धेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संदीप काटे यावेळी उपस्थित होते.

आबालवृद्धांनी वाढवला उत्साह
पहाटेपासूनच जाणवणारी हवामानातील आद्रता, सतत उंच उंच होत जाणारा डोंगर व रस्त्याच्या दुतर्फा धावणार्या स्पर्धकांची जत्रा प्रत्येक धावपटूची परीक्षा घेत होते परंतु याही विपरीत परीस्थितीत सातार्यातील अबालवृद्ध नागरीकांनी प्रत्येक धावपटूचे टाळ्या वाजवून केलेले स्वागत धावपटूंचा उत्साह वाढवीत होते. ठीकठिकाणी शालेय विद्यार्थी बँड, ढोल, लेझीम वाजवून स्पर्धकांचे स्वागत करीत होते. शिवाय ठीकठिकाणी पेयजलाची व्यवस्था, बिस्कीट, चॉकलेट, गूळ आदी उत्साहवर्धक खाद्यपदार्थांची केलेली काटेकोर व्यवस्था वाखाणण्याजोगी होती. चोख पोलीस बंदोबस्तामुळे रहदारीचे नियमन योग्य होऊन धावपटूंसाठी रस्ता अगदी मोकळा करण्यात आला होता. या यशाबद्दल भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे प्रमुख प्रा. प्रवीण फालक, सर्व धावपटू, सायकलपटू व जलतरणपटू यांसह शहरातील असंख्य नागरीकांनी धावपटूंचे अभिनंदन केले.
