स्वस्त धान्याचा काळाबाजार : रावेरसह यावलमधील दुकानदारांविरुद्ध गुन्हा


रावेर शहरात पुरवठा विभागाच्या कारवाईत 28 लाखांचे धान्य जप्त ; नागरीकांच्या तक्रारीनंतर तीन गोदामांना पथकाने ठोकले सील

रावेर : रावेरसह यावल तालुक्यातील लाभार्थींना स्वस्त धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने व गोरगरीबांच्या हक्काचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची तक्रारी पुरवठा विभागाकडे आल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी रावेरमधील तीन गोदामांवर बुधवारी रात्री धाड टाकत तब्बल 28 लाखांचे धान्य जप्त केले. याप्रकरणी यावसह रावेरमधील स्वस्त धान्य दुकानदाराविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, धान्याच्या पोत्यांवर महाराष्ट्रासह पंजाब व हरीयाणातील राज्यातील पुरवठा विभागांचे शिक्के असल्याने स्वस्त धान्याचा काळा बाजार करणारे यामागे सक्रिय असल्याची दाट शक्यता असून पोलिस प्रशासनाने राज्यातील या रॅकेटचा भंडाफोड करून आरोपींना गजाआड करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई
जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलिस उपनिरीक्षक अजित देवरे, सुनील कदम, मंदार पाटील, मंडळाधिकारी शरीफ तडवी, शिवकुमार लोलपे, तालुका पुरवठा अधिकारी हर्षल पाटील यांनी बुधवारी रात्री उशिरापर्यंत कारवाई करीत तीन गोदाम सील केले.

रावेरसह यावलमधील दुकानदारांवर संशयाची सुई
रावेर बाजार समितीमधील योगेश पाटील यांच्या गोदामात असलेल्या वाहनातून तीन लाख 57 हजार 300 रुपये किंमतीचा 198 क्विंटल 50 किलो वजनाचा तांदूळ, 43 हजार रुपये किंमतीची 21 क्विंटल 50 किलो साखर, एक लाख 86 हजार रुपये किंमतीचा 93 क्विंटल गहू जप्त करण्यात आला. हा धान्यसाठा यावल तालुक्यातील एका दुकानदाराने रावेरात पाठवल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर पथकाने रेशन दुकानदार विलास श्रावण चौधरी यांच्या रावेर ग्रामीण भागातील गोदामावर छापा टाकत तीन लाख 57 हार 300 रुपये किंमतीचा 487 क्विंटल गहू जप्त केला तर बर्‍हाणपूर रोडवरील हॉटेल प्रेसिडेंट मागील विलास चौधरी यांच्या गोदामातून 13 लाख रुपये किंमतीचा एक हजार क्विंटल मका जप्त करण्यात आला. तब्बल 28 लाख 60 हजार तीनशे रुपये किमतीचा रेशनचा साठा जप्त करून गोदाम सील करण्यात आले. गुरुवारी रात्री उशिरा धान्य दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


कॉपी करू नका.