शिक्षकाचा प्रामाणिकपणा : हरवलेले पाकिट केले परत


भुसावळ : जामनेरहून भुसावळकडे बसमध्ये प्रवास करत असतांना सीटखाली सापडलेले पाकिट मूळ मालकाला परत करीत शहरातील श्री संत गाडगे महाराज हिंदी विद्यालयातील उपशिक्षक कृष्णा नारायण येले या शिक्षकाने प्रामाणिकपणे जपला.

शिक्षक येले यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक
नाशिक येवला येथील रहिवाशी व मुंबई येथील वोडाफोन कंपनीतील मॅनेजर रोहित सुभाष निकम हे पुण्याहून औरंगाबादला आले आणि तेथून औरंगाबाद-रावेर बसने सिल्लोडला उतरले. याचदरम्यान त्यांच्या खिशातील पाकिट सीटखाली पडले. त्यानंतर याच बसमध्ये जामनेर येथून कृष्णा येले हे शिक्षक बसले. त्यांना सीटखाली पडलेले पाकिट दिसले. त्यांनी बसमधील प्रवाशांना विचारले असता कोणीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे थेट शाळेत येऊन त्यांनी पर्यवेक्षक प्रमोद आठवले, राहुल पाटील, राधेशाम परदेशी, दीपक आमोदकर यांच्याशी चर्चा केली. सर्वांनी मिळून पाकिट उघडून पाहिले असता त्यात पॅनकार्ड, आधारकार्ड, इलेक्शन कार्ड, स्टेट बँक, अ‍ॅक्सिस बँक व युनियन बँकेचे एटीएम आणि मुथुट फायनान्स कंपनीचे एटीएम, पोलिस प्रशिक्षण केंद्राचे ओळखपत्र, इंडियन ऑईल पेट्रोल कार्ड, हनुमान चालिसा स्तोत्र पुस्तिका, 900 रुपये रोख असा ऐवज होता. पाकिट मालकाचा शोध घेण्यासाठी आधारकार्डवर असलेले नाव व फोटो पाहून फेसबुकवर सर्च केले परंतु तशी व्यक्ती आढळून आली नाही. आधारकार्डवर येवला येथील पत्ता असल्याने राहुल पाटील यांचे येवला येथील मित्र मयूर दराडे यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवली. त्यांनी निकम यांचा मोबाईल क्रमांक मिळवून दिल्यावर त्यावर संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी रात्रीपासून झोपलो नाही, सध्या मुंबईला आहे, असे सांगितले त्यामुळे सदरचे पाकिट कुरीयरने आधार कार्डच्या पत्त्यावर पाठवणार असल्याचे श्री संत गाडगे महाराज हिंदी विद्यालयातील पर्यवेक्षक प्रमोद आठवले व राहुल पाटील यांनी सांगितले. प्रामाणिकपणा दाखविल्याबद्दल कृष्णा येले या शिक्षकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !