पाणलोट क्षेत्रात दमदार हजेरी : हतनूरचे 41 दरवाजे उघडले
Strong presence in catchment area: 41 doors of Hatnoor opened भुसावळ : हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रातील तापीवरील बर्हाणपूर, देडतलाई व टेक्सा या पर्जन्यमापक केंद्रांच्या परीसरात दमदार पाऊस होताच धरणात मोठ्या प्रमाणावर साठा झाल्यानंतर धरणाचे संपूर्ण 41 दरवाजे उघडण्यात आल्याने तापी नदीला पूर आला आहे. धरणाच्या पाणलोटक्षेत्रात शुक्रवारी रात्री आठ ते शनिवारी सकाळी आठ या 12 तासांमध्ये तब्बल 644 मिलीमीटर पाऊस झाल्याने धरणाची जलपातळी वाढली. दरम्यान नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जुलै महिन्यातही उघडले होते दरवाजे
हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात झालेल्या पावसानंतर 22 जुलै रोजी संपूर्ण 41 दरवाजे उघडण्यात आले तर आता शनिवार, 16 सप्टेंबर रोजी पुन्हा संपूर्ण दरवाजे उघडण्यात आले आहेत. तापीनदी दुथडी भरुन वाहत असल्याने दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासांत हतनूरच्या पाणलोटक्षेत्रात तब्बल 644 मिली पाऊस झाला. शनिवारी पहाटे चार वाजता 4 दरवाजे पूर्ण व 37 दरवाजे तीन मिटरने उघडून विसर्ग झाला. यानंतर पुन्हा आवक कायम असल्याने सकाळी नऊ वाजता संपूर्ण 41 दरवाजे उघउून विसर्ग करण्यात आला. दरम्यान तापी नदीवरील बर्हाणपूर येथे 55.2, देडतलाई येथे 127.8, टेक्सा येथे 373.2 तर पूर्णा नदीवरील ऐरडी 18.8, गोपाळखेडा 15.6, लखपूरी 16.2, लोहारा 31.0, अकोला 7 मिली असा एकूण 644 मिली अर्थात सरासरी 80.6 मिली पाऊस झाल्याचे धरणावरील सूत्रांनी सांगितले.
