हतनूरच्या बॅकवॉटरने केळी, कापसासह मक्याचे कोट्यवधींचे नुकसान
वादळी पावसाने हाहाःकार : जिल्हाधिकार्यांसह लोकप्रतिनिधींकडून नुकसानीची पाहणी
Hatnoor backwater damages banana, cotton and maize worth crores रावेर : तापी नदीच्या उगम स्थानासह मध्य प्रदेशात झालेल्या जोरदार पावसामुळे शनिवारी तापी नदीला मोठा पूर आला त्यातच हतनूर धरणाचे सर्व दरवाजे उघडल्यानंतर तापी नदीला पूर आल्यानंतर बॅक वॉटरचे पाणी रावेर तालुक्यातील शेत-शिवारात तसेच रस्त्यांवर आल्यानंतर शेती पिकांची प्रचंड हानी झाली. वादळी वार्यासह झालेल्या पावसाने केळीचे मोठे नुकसान झाले असून त्यासोबत पुराचे पाणी शेतात शिरल्याने कापसासह मकचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. शनिवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, तहसीलदार बंडू कापसे यांनी निंबोल येथे भेट देऊन परीस्थितीची पाहणी केली.
सहा गावांचा संपर्क तुटला
शनिवारी तापी नदीला पूर आल्यानंतर हतनूर मध्यम प्रकल्पाचे सर्व 41 दरवाजे उघडल्यानंतरही त्यातून पुराचे पाणी न निघाल्याने तालुक्यातील गावांमध्ये बँक वॉटरचे पाणी शिरले. ऐनपूरसह विटवा, निंबोल पातोंडी, अजनाड, खिरवड आदी गावासह शेतशिवारात शिरलेल्या पाण्यामुळे कोणतीही हानी झाली नसलीतरी शेती पिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. रावेर तालुक्यात रात्रीपासून मध्यम स्वरूपाचा संततधार पाऊस व तापी नदीला पूर आल्याने बॅक वॉटरमुळे ऐनपूर निंबोल, खिरवड, नेहता, दोधे या गावांचा संपर्क तुटला होता मात्र तापीचा पूर ओसरला असून वाहतूक पूर्ववत झाली आहे.

सर्वाधिक केळीला फटका
संततधार पाऊस होत असल्यामुळे तालुक्यातील सर्वच नदी-नाले दुधड़ी भरून वाहत आहे. तापी नदीला महापूर आल्यामुळे हतनूर धरणाचे बॅक वॉटर शेती शिवार व रस्त्यावर आल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. बॅक वॉटरचे पाणी ऐनपूरसह निंबोल, खिरवड, नेहेते येथे नदीकाठी शेतीत पाणी शिरल्याने उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. जोरदार हवेमुळे केळीची खोडे आडवी पडून नुकसान झाले. जोरदार वादळी वार्यामुळे कर्जोद, अहिरवाडी, जुनोने, केर्हाळा, पिंप्री, मंगरूळ, अभोडा यांच्यासह अन्य गावातील शेती शिवारातील काही शेतात केळी खोडे, मका, ज्वारी जमीनदोस्त झाली. कर्जोद शिवारातील सुधाकर महाजन यांच्या गट नंबर 84, 95 मध्ये कापूस मका पिकाचे नुकसान झाले आहे
नदीकाठावर प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
रविवारी धनंजय चौधरी यांनी खिरवडसह नेहता परीसरात नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत कृऊबा संचालक डॉ राजेंद्र पाटील, योगेश सोपान पाटील, संतोष पाटील होते. दरम्यान, महसूल प्रशासनाने तापी काठ व नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

