भिलाली गावातील शेतकर्याचा बोरी नदीपात्रात बुडून मृत्यू
अमळनेर : पारोळा तालुक्यातील भिलाली गावातील शेतकर्याचा बोदी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. म्हशीला शोधण्यासाठी गेल्यानंतर ही दुर्घटना घडली. दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार वृष्टीमुळे बोरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. कमलाकर हिंमत पाटील (55, भिलाली) असे मयत शेतकर्याचे नाव आहे.
म्हैस बचावली मात्र शेतकरी दगावला
बोरी नदीला अचानकपणे आलेल्या पुरात पारोळा तालुक्यातील भिलाली येथील कमलाकर हिंमत पाटील या शेतकर्याची म्हैस सापडली. आपल्या म्हशीला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी ते नदीच्या पात्रात उतरले मात्र पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात आल्यामुळे ते यात बुडाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.






याबाबतची माहिती मिळताच परीसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. तथापि, यात यश आले नाही. अखेर यासाठी राज्य आपत्ती दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाला कमलाकर हिंमत पाटील यांचा मृतदेह आढळून आला. नदीपात्रात सुमारे दोनशे फुट अंतरावर त्यांचा मृतदेह पहाटे आढळला.
मयत कमलाकर हिंमत पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी तसेच तीन भाऊ व त्यांचे कुटुंब असा परिवार आहे. ते दुध विक्रीचा व्यवसाय करत असून यातूनच त्यांनी मुलगा व मुलगीला उच्चशिक्षीत केले आहे. गावासह परिसरात ते दुधवाला आबा म्हणून परीचीत होते. शेतकर्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी तसेच तीन भाऊ असा परीवार आहे.


