दीपनगरात सुरक्षा कर्मचार्यांच्या मारहाणीत कर्मचार्याचा मृत्यू
दोषींवर कारवाईसाठी 210 गेटवर 2 तास मृतदेहासह नातेवाईकांचा ठिय्या
भुसावळ : दीपनगर 210 प्रकल्पाच्या गेटवर सुरक्षा रक्षक व फेकरीच्या प्रगत कुशल प्रशिक्षणार्थीचा शाब्दीक वाद विकोपाला गेल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी केलेल्या मारहाणीत संजय बळीराम बर्हाटे (46, रा.फेकरी) यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह दीपनगर प्रकल्पाच्या गेटवर आणत दोषींवर कारवाईसाठी दोन तास ठिय्या आंदोलन केले. या घटनेनंतर तीन संशयीतांना चौकशीकामी तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
चौघांविरोधात भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा
फेकरीतील प्रवीण नामदेव बर्हाटे यांच्या कन्येचे मंगळवारी गावातच लग्न असल्याने रात्री लग्नात स्वयंपाकासाठी आलेल्या हलवाई व इतर मजूर आल्याने त्यांना चहा घेण्यासाठी संजय बळीराम बर्हाटे (46) हे दीपनगर औष्णिक केंद्राच्या कॅण्टीनमध्ये जात असताना त्यांना गेट क्रमांक 210 जवळ उभे असलेल्या खाजगी सुरक्षा रक्षक सागर मोरे, योगेश (पूर्ण समजू शकले नाही), राजेश बनसोडे यांनी धक्काबुक्की करीत मारहाण केली तसेच कायमस्वरूपी नियुक्त असलेल्या सुरक्षा अधिकारी लोकरे यांनीही शिवीगाळ करून मारहाण केल्याने बर्हाटे यांचा जागीच मृत्यू झाला तर या घटनेनंतर तिघे खाजगी सुरक्षा रक्षक पसारर झाले. नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेवून तातडीने भुसावळातील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. या प्रकरणी सुरक्षा अधिकारी लोकरे यांना ताब्यात घेतले असून सागर मोरे, सुरक्षा अधिकारी लोकरे आणि इतर दोघे असे एकूण चौघांविरोधात खुनासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

