अमळनेरात गोळीबाराच्या निषेधार्थ व्यापार्‍यांचा बंद व मूक मोर्चा


अमळनेर : दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी व्यापार्‍यावर गोळीबार करीत रोकड लांबवण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी रात्री घडल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी शहरातील सिंधी समाजासह अन्य व्यापार्‍यांनी प्रतिष्ठाने बंद ठेवत राणी लक्ष्मीबाई चौकातून मूक मोर्चा काढला. सुभाष चौक मार्गे गंगाघाट बाजारपेठ, भागवत रोड, बसस्थानकमार्गे मोर्चा प्रांत कार्यालयात आल्यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

300 व्यापार्‍यांचा मोर्चात सहभाग
मोर्चात लालचंद सैनानी, भरत ललवाणी, शंकर बितराई, प्रकाश शहा, चेलाराम सैनानी, बिपीन कोठारी, महेश कोठावदे, राजेश कोठावदे, दिलीप सैनानी, राकेश माहेश्वरी, हरि भिका वाणी, पंकज मराठे, विनोद कोठारी, फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष महेंद्र पाटील, अनिल कोराणी, पुरुषोत्तम शेट्ये, विलास चौधरी, श्रीराम चौधरी, राकेश ललवाणी यांच्यासह सुमारे 300 व्यापारी सहभागी झाले. दरम्यान, व्यापारी तथा माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी यांनी वाढत्या गुन्हेगारीला आळा न बसल्यास बेमुदत बंद पुकारण्याचा इशारा दिला तर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र पिंगळे यांनी घटनेचा निषेध व्यक्त करीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना लक्ष घालण्यासाठी साकडे घालू असे सांगितले. शहरातील सीसीटीव्हीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून या बंदला फोटोग्राफर संघटना आणि मेडिकल दुकानदारांनी पाठिंबा दिला.

अप्रिय घटनेने व्यापार्‍यांमध्ये दहशत
नर्मदा वाडीजवळ बसंतराय तेजुमल बितराई व अजय यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गावठी पिस्तूलने गोळीबार केला मात्र सुदैवाने गोळी भिंतीला लागल्याने अनर्थ टळला तर या घटनेने शहरातील सामान्य नागरीकांसह व्यापार्‍यांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !